मैत्रीला तडा : मैत्रिणीच्या घरातूनच सोन्याची चोरी करणारी महिला अटकेत
पोलीस महानगर नेटवर्क
पनवेल : मैत्रीवर विश्वास ठेवणं एका महिलेला चांगलंच महागात पडलं असून, कामोठे परिसरात मैत्रिणीनेच मैत्रिणीच्या घरातून सोन्याची चोरी केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी मोनिका दिघे हिला अटक केली असून तिच्याकडून चोरीला गेलेले सर्व सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.
कामोठे परिसरात राहणाऱ्या सविता या महिला बाजारात जात असताना त्यांनी समोर राहणाऱ्या मैत्रीण मोनिका हिच्याकडे घराची चावी दिली होती. मात्र, बाजाराहून परत आल्यानंतर सविताला मोठा धक्का बसला. घरातील सोन्याचे दागिने गायब होते, तर दरवाजाला पूर्वीसारखंच कुलूप लावलेलं आढळून आलं.
चौकशीदरम्यान मोनिकाने सुरुवातीला घरात गेल्याचंच नाकारलं. त्यामुळे संशय बळावल्याने सविताने कामोठे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले असता त्यात काहीही संशयास्पद आढळलं नाही. मात्र पुढील तपासासाठी डीव्हीआर तपासण्यात आल्यानंतर त्यात छेडछाड झाल्याचं उघडकीस आलं.
यानंतर पोलिसांनी संशयाच्या आधारावर मोनिकाला ताब्यात घेऊन चौकशी केली असता तिने गुन्ह्याची कबुली दिली. तिच्याकडून चोरी केलेले सर्व सोन्याचे दागिने पोलिसांनी जप्त केले आहेत. न्यायालयाने आरोपी महिलेला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, ‘मैत्रीवर ठेवलेला विश्वासच फसवा ठरला’ अशी भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.