पुण्यातील ३०० कोटींच्या जमीन घोटाळ्यात शीतल तेजवानीला अटक; मुख्य सूत्रधार असल्याचा पोलिसांचा दावा

Spread the love

पुण्यातील ३०० कोटींच्या जमीन घोटाळ्यात शीतल तेजवानीला अटक; मुख्य सूत्रधार असल्याचा पोलिसांचा दावा

पोलीस महानगर नेटवर्क

पुणे : पुण्यातील मुंढवा परिसरातील ४० एकर जमिनीच्या ३०० कोटींच्या गैरव्यवहार प्रकरणात मुख्य आरोपी शीतल तेजवानीला पुणे पोलिसांनी अटक केली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या कंपनीसाठी ही जमीन खरेदी करण्यात आल्याचा आरोप असून, या व्यवहारात तेजवानीचा थेट सहभाग असल्याचे तपासात स्पष्ट झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.

या प्रकरणात शीतल तेजवानीची आतापर्यंत दोन वेळा चौकशी करण्यात आली होती. चौकशीत मिळालेल्या ठोस पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी तिला मुख्य सुत्रधार मानत अटक केली. यापूर्वी या प्रकरणातील गुन्हा रद्द करण्यासाठी तेजवानीने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मुख्य न्यायाधीश चंद्रशेखर व न्या. गौतम अंखड यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी झाली होती. मीडियातील बातम्यांमुळे आपल्याला लक्ष्य केले जात असल्याचा दावा तेजवानीकडून करण्यात आला होता.

मुंढवा जमीन गैरव्यवहारप्रकरणी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील बावधन पोलीस ठाण्यात यापूर्वी दिग्विजय पाटील, शीतल तेजवानी आणि रविंद्र तारू यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर पुणे पोलिसांनी देखील तपासात उडी घेत तब्बल नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल केला होता.

१८०० कोटींची जमीन केवळ ३०० कोटींमध्ये खरेदीचा आरोप

या प्रकरणात मुंढव्यातील सुमारे १८०० कोटी रुपयांची जमीन पार्थ पवार यांच्या कंपनीने अवघ्या ३०० कोटी रुपयांत खरेदी केल्याचा गंभीर आरोप आहे. विशेष म्हणजे या व्यवहारासाठी केवळ ५०० रुपयांची स्टॅम्प ड्युटी भरल्याचेही उघड झाले होते. अवघ्या एक लाख रुपयांच्या भांडवलावर स्थापन झालेल्या कंपनीकडून कोरेगाव पार्क परिसरात आयटी पार्क व डेटा सेंटर उभारण्याची तयारी कशी शक्य झाली, असा सवाल विरोधकांनी उपस्थित केला होता.

उद्योग संचालनालयाने दावा दाखल झाल्यानंतर अवघ्या ४८ तासांत स्टॅम्प ड्युटी माफ केल्याचे तसेच फक्त २७ दिवसांत संपूर्ण व्यवहार पूर्ण झाल्याचे समोर आले होते. या प्रकरणाने माध्यमांत मोठी चर्चा रंगवल्यानंतर संबंधित जमीन व्यवहार रद्द करण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली होती.

दरम्यान, शीतल तेजवानीच्या अटकेमुळे तपासाला आणखी गती मिळण्याची शक्यता असून, पुढील काळात आणखी मोठे खुलासे होण्याची दाट शक्यता पोलिस सूत्रांकडून व्यक्त केली जात आहे. या प्रकरणावरून राज्यातील राजकीय वातावरणही चांगलेच तापले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon