इंडिगो एअर लाईन्सच्या स्टाफच्या संपामुळे अनेक विमानं रद्द; मुंबई विमानतळावर प्रवाशांची प्रचंड गर्दी
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई – मुंबई विमानतळावर प्रवाशांची प्रचंड गर्दी वाढली आहे. इंडिगो एअर लाईन्सच्या स्टाफने अचानक संप पुकारला आहे. त्यामुळे मुंबई विमानतळावर प्रवाशांची मोठी गर्दी झाली आहे. आतापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार, कॅबिन क्रू आणि स्टाफच्या मॅनेजमेंटमध्ये वाद झाला आहे. या वादाचा फटका प्रवाशांना बसताना दिसतोय. इंडिया एअर लाईन्सच्या स्टाफच्या संपामुळे अनेक विमानं रद्द झाल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे.
विशेष म्हणजे इंडिगोच्या कर्मचाऱ्यांचा संपाचा फटका केवळ मुंबईत होताना दिसत नाही, तर नाशिकमधून देखील याबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. नाशिकमध्ये देखील इंडिगो कंपनीचे अनेक कर्मचारी रजेवर गेल्याने विमानांच्या उड्डाणांवर परिणाम झाला आहे. नाशिक विमानतळावरील सायंकाळचे नवी दिल्लीला जाणारं विमान रद्द करण्यात आलं आहे. तसेच अन्य सर्व विमाने उशिरा असल्याची माहिती मिळत आहे.
मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर सकाळपासून मोठी गर्दी पाहायला मिळत असून प्रवाशांना प्रचंड गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. इंडिगो एअरलाईन्सच्या कॅबिन क्रू आणि ग्राउंड स्टाफने अचानक कामबंद आंदोलनाला सुरुवात केल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे. शिफ्ट वाटप आणि ड्युटी तासांबाबत मॅनेजमेंटसोबत सुरू असलेल्या वादातूनच हे आंदोलन उफाळून आल्याचे प्राथमिक वृत्त आहे.
आंदोलनामुळे इंडिगोच्या अनेक फ्लाइट्स उशिराने सुरू होत आहेत, तर काही फ्लाइट्स रद्द करण्याची वेळ कंपनीवर आली आहे. यामुळे देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय प्रवाश्यांची मोठी कोंडी झाली आहे. तिकीट तपासणी काउंटर, सुरक्षा तपासणी विभाग आणि बोर्डिंग गेट परिसरात प्रवाशांनी मोठ्या रांगा लागल्या आहेत. अनेकजण आपापल्या फ्लाइट्स चुकण्याच्या भीतीने अस्वस्थ दिसत आहेत.
दरम्यान, इंडिगो व्यवस्थापनाकडून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू असून चर्चा सकारात्मक दिशेने जात असल्याची माहिती मिळत आहे. तथापि, आंदोलनामुळे विमानतळावरील कार्यव्यवहार पूर्णपणे विस्कळीत झाले असून सामान्य प्रवाशांना मोठा फटका बसला आहे.