तंत्रज्ञानाशी मैत्री केली पाहिजे – चिन्मय गवाणकर
रवि निषाद / मुंबई
मुंबई – तंत्रज्ञान अतिशय झपाट्याने बदलत असून त्याचा कालावधी अवघ्या १२ ते १८ महिन्यांचा आहे. त्यामुळे नवीन तंत्रज्ञानाशी मैत्री करणे काळाची गरज असल्याचे मत माहिती तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता तज्ज्ञ चिन्मय गवाणकर यांनी व्यक्त केले. विद्यार्थी उत्कर्ष मंडळ आयोजित ६८व्या विवेकानंद व्याख्यानमालेतील ‘एआय – भीती की संधी’ या विषयावरच्या पाचव्या व अंतिम व्याख्यानात ते बोलत होते.
गवाणकर म्हणाले की, ९० च्या दशकातील तंत्रज्ञान लोकांपर्यंत पोहोचायला वेळ लागत असे. मात्र आजच्या युगात हे चित्र पूर्ण बदलले आहे. ट्विटरला लोकप्रिय होण्यासाठी २ वर्षे, इंस्टाग्रामला अडीच महिने तर चॅटजीपीटीला अवघ्या ५ दिवसांत जागतिक पातळीवर पोहोच मिळाली. एआयचे संकुचित, सामान्य आणि सुपर असे तीन प्रमुख स्तर असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे रोजगार नष्ट होतील हा समज चुकीचा असल्याचे सांगताना गवाणकर म्हणाले, “येणाऱ्या काही वर्षांत १७ कोटी नवीन रोजगार निर्माण होतील. ९.२ कोटी रोजगार तंत्रज्ञानामुळे विस्थापित होतील, तर ७.८ कोटी नवे रोजगार उपलब्ध होतील; मात्र त्यांना अद्याप स्पष्ट शीर्षके नाहीत.” मुलांना तंत्रज्ञान वापरासाठी प्रोत्साहन द्यावे, परंतु त्याचा योग्य वापर होत आहे याची खबरदारी पालकांनी घ्यावी, असेही त्यांनी सुचविले.
कार्यक्रमात ‘विवेकानंद स्मृती’ या जाहिरात अंकाचे प्रकाशन गवाणकर यांच्या हस्ते झाले. प्रमुख पाहुणे म्हणून समाजसेवक राजेंद्र लांजवळ उपस्थित होते. व्याख्यानमाला प्रमुख मंगेश सावंत यांनी प्रास्ताविक केले. मान्यवरांचा परिचय शैलेंद्र राणे यांनी, तर आभार प्रदर्शन विकास शिंदे यांनी केले. बोधपटाचे वाचन अशिष देवळेकर यांनी केले असून सुस्वागतम अथर्व मोरे यांनी सादर केले. गीत सतीश घाडी यांनी सादर केले.
ईशान वारे व सार्थक खेडकर या मुलांनी घरोघरी जाऊन सत्र तिकीट विक्री केल्याबद्दल त्यांचा मान्यवरांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.