वाढत्या सायबर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र रेल्वे प्रवासी महासंघाची ठाणे सायबर सेलला भेट
पोलीस महानगर नेटवर्क
ठाणे – महाराष्ट्र रेल्वे प्रवासी महासंघ तसेच फळ, फुल, भाजीपाला विक्रेते व फेरीवाले श्रमिक संघटनेचे अध्यक्ष आणि रेल्वे मंत्रालयाचे सेंट्रल रेल्वे सल्लागार समिती सदस्य अभिजीत धुरत यांच्या नेतृत्वाखाली महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी ठाणे शहरातील सायबर सेल पोलीस ठाण्याला भेट देऊन वाढत्या सायबर गुन्हेगारीबाबत सविस्तर चर्चा केली.
या भेटीदरम्यान पोलीस निरीक्षक सुदेश आजगावकर यांच्यासोबत सायबर फसवणूक, हॅकिंग आणि डिजिटल गैरवापरासंबंधी तक्रारींचा आढावा घेण्यात आला. महासंघाचे पदाधिकारी स्वप्नील गायकवाड यांच्या मोबाईल फोनचे २२ नोव्हेंबर २०२५ रोजी हॅकिंग करून त्यांच्या वेगवेगळ्या व्हॉट्सॲप गटांवर अश्लील फोटो प्रसारित करण्यात आले होते. हीच सामग्री महासंघाच्या रेल्वे प्लॅटफॉर्म २ गटावरही टाकण्यात आली होती.
तक्रार दाखल झाल्यानंतर पोलीसांनी स्वप्नील गायकवाड यांचा मोबाईल जप्त करून तात्काळ तपासणी केली. प्राथमिक चौकशीत लिंक शेअरिंगच्या माध्यमातून मोबाईलमध्ये अनधिकृत प्रवेश मिळवून त्याचा गैरवापर झाल्याचे निदर्शनास आले. या प्रकरणाचा पुढील तपास सायबर सेलमार्फत सुरू आहे.
यावेळी निरीक्षक आजगावकर यांनी नागरिकांना कोणताही सायबर गुन्हा अथवा फसवणूक झाल्यास सायबर हेल्पलाइन 1930 वर त्वरित संपर्क साधण्याचे आवाहन केले.
या भेटीत महाराष्ट्र प्रदेश प्रेस सेल प्रमुख मीनल पवार, बदलापूर स्टेशनचे उपाध्यक्ष स्वप्नील गायकवाड, पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते तसेच रेल्वे प्रवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.