गोवंडीमध्ये अपक्ष उमेदवाराची चर्चा; जनतेनेच निवडला आपला ‘नेता’
रवि निषाद / मुंबई
मुंबई : गोवंडी परिसरात स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यावर्षी अनोखा राजकीय प्रयोग पाहायला मिळाला आहे. शिवाजी नगर–बैगनवाडी येथील रहिवासी आणि सामाजिक कार्यकर्ते जमीर कुरेशी यांनी उमेदवारी जाहीर करण्यापूर्वी आपल्या प्रभागातील नागरिकांची थेट मते जाणून घेत निर्णय घेण्याची अभूतपूर्व पद्धत अवलंबली.
निवडणूक लढवावी का? आणि लढवायची तर पक्षाच्या तिकिटावर की अपक्ष म्हणून? हा प्रश्न त्यांनी थेट जनतेसमोर ठेवला. अनेक वर्षे सामाजिक कार्यात सक्रिय असलेल्या कुरेशी यांनी आपल्या प्रभागातील समस्यांवर सातत्याने काम केल्यामुळे परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने त्यांच्या सभेला उपस्थित राहिले. बैगनवाडीतील बागेत झालेल्या या जाहीर सभेला दोन हजारांहून अधिक रहिवाशांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
सभेत नागरिकांनी स्पष्ट शब्दात नाराजी व्यक्त केली की बाहेरून येणाऱ्या उमेदवारांना पाच वर्षांत एकदाच पाहायला मिळते — तेही फक्त रिबन कापण्यासाठी किंवा कंत्राटदारांच्या भेटीसाठी. या पार्श्वभूमीवर स्थानिक ‘आपला माणूस’ पुढे येण्याची मागणी त्यांनी केली.
एक ज्येष्ठ नागरिकांनी माईक हातात घेत म्हणाले, “पक्षाचे लोक जिंकले की पक्ष बदलतात. पण आम्हाला आपला नेता हवा आहे. यावेळी तू अपक्ष म्हणून लढ.” तरुणांनीही एकमुखाने घोषणा दिली की, “जमीर भाई, यावेळी कोणत्याही पक्षाचा नाही… गोवंडीचा मुलगा जिंकला पाहिजे!” जमीर कुरेशी यांनी शिक्षण, आरोग्य, स्वच्छता, महिलांसाठी प्रशिक्षण, तसेच अंमली पदार्थविरोधी मोहिम यांसारख्या विविध उपक्रमांतून परिसरात सातत्याने काम केले असल्याने नागरिकांनी त्यांच्यावर विश्वास व्यक्त केला.
या अनोख्या घटनेमुळे गोवंडीमध्ये प्रथमच निवडणूक होण्यापूर्वीच लोकांनी आपला उमेदवार अधिकृतपणे ‘निवडला’ अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. प्रभागात कोणाचा ‘होनहार नगरसेवक’ होतो हे प्रत्यक्ष निकालानंतर स्पष्ट होईल, परंतु जनतेचा थेट सहभाग आणि स्थानिक नेतृत्वाला दिलेला पाठिंबा ही गोवंडीतील राजकारणातील महत्त्वाची नोंद ठरत आहे.