ठाणे लोकसभा मतदारसंघातील प्रलंबित रेल्वे विकासकामांना गती द्यावी – खासदार नरेश म्हस्के यांची मागणी
पोलीस महानगर नेटवर्क
नवी दिल्ली : ठाणे लोकसभा मतदारसंघातील ठाणे, मीरा रोड, भाईंदर, ऐरोली, बेलापूर, वाशी तसेच ठाणे–मुलुंडदरम्यानच्या नव्या स्थानकासह सर्व प्रलंबित कामांना तातडीने मंजुरी देऊन मार्गी लावावे, अशी मागणी खासदार नरेश म्हस्के यांनी रेल्वे सल्लागार समितीच्या बैठकीत केली.
केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत रेल्वे अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणावर खासदार म्हस्के यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत “मुजोर अधिकाऱ्यांना वठणीवर आणा” अशी ठणकावलेली मागणी केली.
अमृत भारत योजना अंतर्गत ठाणे स्थानकाच्या ९४९ कोटींच्या आधुनिकीकरण प्रस्तावाला त्वरित मंजुरी, ठाणे–मुलुंड दरम्यान नवीन स्थानकाचे काम गतीमान करणे, ठाणे स्टेशनवरील पादचारी पूल व एक्सलेटरची वाढ, भाईंदर–चर्चगेट लोकल वाढविणे, नव्या गाड्या सुरु करणे, तसेच शौचालये, पिण्याचे पाणी व तिकीट सुविधा यांसारख्या मूलभूत सोयीसाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी त्यांनी मांडली.
सिडको आणि मध्य रेल्वे यांच्यातील समन्वयाच्या अभावामुळे नवी मुंबईतील स्थानकांची झालेली दुरवस्था तातडीने सुधारण्यावर त्यांनी भर दिला. देशभरातील खासदारांसोबत समन्वय साधण्यासाठी ‘संयोजक अधिकारी’ नेमण्याचीही सूचना त्यांनी केली.
या मागण्यांना खासदार संजय पाटील आणि सुरेश म्हात्रे यांनी पाठिंबा देत रेल्वे मंत्री वैष्णव यांना त्वरित निर्णय घेण्याची विनंती केली.