आठवड्यापूर्वी लग्न, देवदर्शनासाठी निघालेल्या तरुणाचा स्टेशनवर तोल गेला; आरपीएफ पोलिसामुळे तरुणाचा जीव बचावला
योगेश पांडे / वार्ताहर
पुणे – रेल्वे स्टेशनवर, प्लॅटफॉर्मवर प्रवाशांची धावाधाव असते, ही गाडी सोडा आणि ती गाडी पकडा यासाठी प्रवाशांची रेलचेल नेहमीच पाहायला मिळते. या धावाधावीच्या प्रसंगातून अनकेदा अपघातही घडतात. मुंबईतील गर्दीच्या लोकल पकडताना प्रवाशांता तोल सुटला किंवा घाई घाईत लवकर पाय बाहेर काढला की अपघाताच्या घटना घडल्याचे अनेक उदाहरणं आहेत. तर, अनेकदा लोकल रेल्वे स्टेशनवरील अपघाताच्या घटनांवेळीही स्थानिक प्रवासी आणि रेल्वे पोलीस प्रवाशांच्या मदतीला धावतात. येथील सीसीटीव्ही घटनेत अशा अनेक देवदूत बनलेल्या आरपीएफचे प्रसंग कैद झाले आहेत. आता, लोणावळा रेल्वे स्टेशनवरही अशीची एक घटना उघडकीस आली आहे.
लोणावळा रेल्वे स्टेशनवर २३ नोव्हेंबरला जीवघेणा प्रसंग घडला आणि तेवढ्याच क्षणात आरपीएफ जवानांनी दाखवलेल्या सतर्कतेमुळे एक प्रवाशाचा जीव वाचला. रेल्वे पोलिसांची तत्परता आणि नशिब बलवत्तर म्हणूनच हा प्रवासी रेल्वेच्या प्लॅटफॉर्ममधील फटीत जाता जाता थोडक्यात बचावला. चेन्नई एक्सप्रेस लोणावळा स्टेशनवरुन सुटत असताना एसी कोचमधील श्रुंग गुप्ता यांचा पाय घसरला आणि ते थेट ट्रेन आणि प्लॅटफॉर्मच्या मधोमध अडकले होते. मात्र, लोणावळा स्टेशनवर ड्युटीवरील आरपीएफचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र मोहन आणि निरिक्षक विपिन कुमार यांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेत गुप्ता यांना बाहेर खेचून सुरक्षितपणे प्लॅटफॉर्मवर आणले. विपीन कुमार यांच्या धाडसामुळे मोठी दुर्घटना टळली.
गुप्ता यांचा अवघ्या एक आठवड्यापूर्वी विवाह झाला होता. नवविवाहित दाम्पत्य हे पंढरपूर विठ्ठल दर्शनासाठी जात असताना ही घटना लोणावळा स्टेशनवर घडली. “ट्रेन पकडण्याचा नादात हा प्रवासी पडला आणि रेल्वे पोलिसांच्या कृपेने वाचलो. आरपीएफ म्हणजे साक्षात विठू माऊलीच मदतीला आली,” असे गुप्ता दांपत्याने सांगत आरपीएफ कर्मचाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानले. या धाडसामुळे रेल्वे पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे. धाडस, तत्परता आणि जीव वाचवण्याची कृती आरपीएफ जवानांनी खऱ्या अर्थाने ‘सेवा सुरक्षितता’ची जाणीव करून दिली आहे.