ठाण्यात भाजप आणि शिवसेना शिंदे गटात रात्री जोरदार राडा; भाजपच्या माजी नगरसेवकाकडून शिंदे गटाच्या शाखाप्रमुख आणि उपविभाग प्रमुखाला मारहाण
योगेश पांडे / वार्ताहर
ठाणे – ठाण्यात भाजप आणि शिवसेना शिंदे गटात गुरुवारी रात्री राडा झाला. भाजपच्या माजी नगरसेवकाने शिवसेना शिंदे गटाच्या शाखाप्रमुख आणि उपविभाग प्रमुखाला मारहाण केल्याची तक्रार नौपाडा पोलीस स्थानकात करण्यात आली आहे. भाजपचे माजी आणि जेष्ठ नगरसेवक नारायण पवार यांनी शिवसेना शिंदे गटाचे हरेश महाडीक, शाखाप्रमुख आणि महेश लहाने, उपविभागप्रमुख यांना मारहाण केल्याचा आरोप शिवसेना शिंदे गटाकडून करण्यात आला. मात्र मी कोणालाच मारहाण केलेली नाही, असा दावा नारायण पवार यांनी केला.
इथल्या रहिवाशांना जे १ टक्का स्टँम्प ड्युटी लागणार होती, ते १०० रूपये लागणार म्हणून आम्ही त्याचं अभिनंदन करण्यासाठी गेलो होतो. त्या १८५ कुटुंबियांसाठी मी मेहनत केली. तेव्हा कुणी आलं नाही. आता स्टंटबाजी करायला आले. तिथे कुठेच जल्लोष नव्हता, मी काही कुणाला मारहाणही केली नाही. काही लोक चुकीची माहिती देऊन गुन्हे दाखल करताय, असा दावा नारायण पवार यांनी केला. तसेच आम्ही महायुतीमध्ये आहोत, युती झाली तर आम्ही युतीतून लढणार आहोत. आम्ही वादावादी करणार नाही. नरेश म्हस्के जेव्हा खासदारकीसाठी उभे होते, तेव्हा आम्ही त्यांचा प्रचार केला होता, असंही नारायण पवार यांनी सांगितले.
गुरुवारी बीएसयूपी घरांना शंभर रुपये रजिस्ट्रेशन फी जाहीर करण्यात आली, एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून हे करण्यात असल्याने शिवसैनिक बीएसयूपी इमारतीत जाऊन सेलिब्रेशन करत होते. पाच पाखाडी विभागातील लक्ष्मी नारायण बिल्डिंगमध्ये असेच सेलिब्रेशन करण्यात येणार होते. मात्र त्याठिकाणी भाजपच्या माजी नगरसेवकाने येऊन शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांन कसे सेलिब्रेशन करता? असे विचारात भाजपचे माजी आणि जेष्ठ नगरसेवक नारायण पवार यांनी मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. यासंदर्भात नारायण पवार यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. मात्र शिवसेना शिंदे गट विरुद्ध भाजप हा व ठाण्यातील वाद आणखी चिघळणार, अशी चिन्हे दिसू लागली आहेत.