बेकायदेशीर कॉल सेंटरवर सायबर पोलिसांची धाड; १७ जणांना अटक, ७ कोटींची फसवणूक उघड
पोलीस महानगर नेटवर्क
नवी मुंबई : महापे येथील मिलेनियम बिझनेस पार्कमधील बेकायदेशीर कॉल सेंटरवर सायबर पोलिसांनी मंगळवारी रात्री छापा टाकत मोठी कारवाई केली. इमारत क्रमांक ३ च्या तिसऱ्या मजल्यावर विनापरवाना सुरू असलेले हे कॉल सेंटर सील करण्यात आले असून १७ जणांना अटक करण्यात आली आहे. तसेच सातहून अधिक संशयितांचा शोध सुरू असून चार जणांना नोटीस बजावण्यात आली आहे. सट्टा बाजारात गुंतवणुकीवर कमी कालावधीत प्रचंड परताव्याचे आमिष दाखवून नागरिकांची फसवणूक केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गगन अजितकुमार थापर, रोशन सुदेश घायवट, सत्यम रामशंकर यादव, महेश अभिमन्यु पाटील, संकेत सरतापे, हर्षद सणस, विनायक चव्हाण, सुमित फडके, अक्षय शिर्के, अमित शिर्के, पंकज शेंडे, सुमेध कोरडे, अतुल ठाकुर, मयुर गायकवाड, गणेश डंगापुरे, गणेश पाटोळे आणि नरेश अहिरवार अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. श्रध्दा गजरे, प्राजक्ता गोळे आणि संतोष धोत्रे यांना नोटीस बजावली असून शिव शर्मा, सचिन लोभे, अजहर जमादार सोनी, हरीष पवार, शॉन आणि लिजा उर्फ स्नेहल यांचा शोध सुरू आहे. संशयित आरोपींचा वयोगट २१ ते ४९ दरम्यान असून बहुतांश तरुणांचा यात सहभाग असल्याचे पोलिसांनी सांगितले.
गेल्या काही महिन्यांपासून सट्टा बाजारात गुंतवणुकीस प्रवृत्त करून दुहेरी-चौपट परताव्याचे आमिष दाखवून लाखो रुपयांची फसवणूक केल्याच्या तक्रारी वाढू लागल्या होत्या. या पद्धतीमागील केंद्रस्थानी असलेले ठिकाण शोधण्यासाठी सायबर पोलिसांनी गुप्त तपास सुरू केला. त्यात महापेतील या कॉल सेंटरमधूनच सट्टा गुंतवणुकीच्या नावाखाली नागरिकांची दिशाभूल होत असल्याचे प्राथमिक पुरावे मिळाले.
पोलिसांनी छापा टाकला तेव्हा कॉल सेंटर पूर्ण क्षमतेने सुरू असल्याचे दिसून आले. कोणतीही परवानगी नसताना हे केंद्र १ जानेवारी २०२५ पासून सुरु असल्याचे उघड झाले. संगणक व तांत्रिक साधनांच्या तपासात आतापर्यंत सुमारे ७ कोटी १ लाख ११ हजार ४०१ रुपयांची फसवणूक झाल्याचे निष्पन्न झाले आहे. हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
बेकायदेशीर केंद्र चालवणे, नागरिकांची फसवणूक करणे, वैयक्तिक माहिती अनधिकृतरीत्या मिळवणे आणि आर्थिक गुन्हे करण्याच्या आरोपांखाली संबंधितांवर माहिती तंत्रज्ञान कायद्यासह विविध कलमांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. कॉल सेंटरचे मूळ चालक व मालक कोण याबाबतचा तपास सुरू असून पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींकडून चौकशी वेगाने सुरू केल्याचे सांगितले.