ट्रेनमध्ये धक्का लागताच हिंदी-मराठी बोलण्यावरुन वाद; ४-५ जणांकडून मारहाण, कल्याणमधील अर्णव खैरेने घरी येऊन जीवन संपवलं
योगेश पांडे / वार्ताहर
कल्याण – कल्याणमधील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कल्याण पूर्व येथील तिसगाव नाका परिसरातील एका महाविद्यालयीन विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. अर्णव खैरे असं या तरुणाचं नाव आहे.
मुलुंड येथे कॉलेजला जाताना ट्रेनमध्ये धक्का लागला. त्यावरून हिंदी-मराठी बोलण्यावरून वाद झाला. या वादातून चार ते पाच जणांनी अर्णव खैरेला बेदाम मारहाण केली. या मारहाणीनंतर मानसिक तणावात असलेल्या अर्णव खैरे यांनी राहता घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. सदर प्रकरणी कोळसेवाडी पोलिसांनी तपास सुरु केला आहे.
सदर घटनेबाबत अर्णव खैरेचे वडील जितेंद्र खैरे यांनी माध्यमांशी बोलताना माहिती दिली. माझा मुलगा अर्णव खैरे नेहमीप्रमाणे कॉलजेला निघाला. सकाळी ट्रेनमध्ये त्याला जास्त धक्का लागत होता. त्यामुळे भाई, थोडा आगे हो जाओ, धक्का लग रहा है, असं अर्णवने एका हिंदी भाषक मुलाला सांगितले. यानंतर बाकीच्या प्रवाशाने अर्णवच्या थेट कानाखाली मारली. तुला मराठी बोलता येत नाही का? मराठी बोलायची लाज वाटते का? माझा मुलगा घाबरत घाबरत मला हे सांगत होता, असं जितेंद्र खैरे म्हणाले. ट्रेनमध्ये असलेल्या प्रवाशांच्या एका ग्रुपने अर्णव मारहाण तर केलीच शिवाय धमकावलं देखील होतं. अर्णवला मुलुंडला उतरायचं असातानाही तो ठाण्याला उतरला. कारण त्याला भांडण वाढवायचं नव्हतं, असं जितेंद्र खैरे यांनी सांगितलं. तसेच माझा मुलगा तर गेला, मात्र असे प्रकार पुढे घडू नयेत. भाषेवरून वाद होऊ नयेत, असं जितेंद्र खैरे यांनी म्हटलं.