लुटेरी ‘दुल्हन’चा कारनामा उघडकीस; ४ लग्न, १२ पुरुषांशी संबंध, ८ कोटींचा व्यवहार
पोलीस महानगर नेटवर्क
कानपूर : उत्तरप्रदेशात एक धक्कादायक प्रकरण समोर आले असून दिव्यांशी चौधरी या महिलेने चार लग्न करून तब्बल १२ हून अधिक पुरुषांना आपल्या जाळ्यात ओढल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. प्रेमसंबंध आणि लग्नाचे आमिष दाखवत तिने अनेकांना शारीरिक संबंधात अडकवले, त्यानंतर खोटे बलात्कार प्रकरण दाखल करून कोट्यवधी रुपयांची वसुली केल्याचा आरोप आहे. कानपूर पोलिसांनी या लुटेरी दुल्हनला अटक केली असून तिच्या संपूर्ण रॅकेटचा तपास सध्या युद्धपातळीवर सुरू आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिव्यांशी अतिशय चलाखपणे विविध सरकारी अधिकारी, डॉक्टर, पोलीस कर्मचारी, बँक अधिकारी यांना जाळ्यात ओढत असे. मैत्री, प्रेमसंबंध आणि लग्नाचे आश्वासन या माध्यमातून ती पुरुषांची गाठ बांधत असे. त्यांच्याकडून शारीरिक संबंध प्रस्थापित केल्यानंतर अचानक बलात्काराचा आरोप करत खोटे एफआयआर दाखल केले जात. जेलची भीती दाखवत तडजोडीच्या नावाखाली लाखो रुपयांची खंडणी वसूल केली जात असे.
तपासात उघड झाले की, दिव्यांशीच्या १० बँक खात्यांत गेल्या काही वर्षांत ८ कोटी रुपयांहून अधिक व्यवहार झाले आहेत. या पैशांपैकी काही रक्कम मेरठ झोनमधील काही पोलीस अधिकारी, एक इंस्पेक्टर आणि इतर कर्मचाऱ्यांच्या खात्यावर गेल्याचेही आढळले. त्यामुळे दिव्यांशी हा संपूर्ण खेळ एकटी करत नसून तिच्या मागे एक मोठे नेटवर्क असल्याची शंका बळावली आहे.
अलीकडेच तिने कानपूरचे पोलीस कमिश्नर अखिल कुमार यांच्याकडे पोलीस अधिकारी आदित्य लोचन याची तक्रार केली होती. त्याच्यासोबत लग्न झाल्याचा दावा करत, पैसे हडपणे आणि इतर महिलांशी संबंध ठेवल्याचा आरोप तिने केला. मात्र चौकशीत आदित्यने सर्व आरोप फेटाळून लावत सांगितले की, दिव्यांशी गेल्या अनेक महिन्यांपासून त्याला वेगवेगळ्या मार्गाने पैसे देण्यासाठी धमकावत होती.
यापूर्वीही दोन बँक मॅनेजरांना खोट्या बलात्कार प्रकरणात अडकवल्याचा तपासात खुलासा झाला आहे. एफआयआर दाखल करून तडजोडीच्या नावावर मोठ्या रकमा उकळणे हेच तिचे मुख्य हत्यार असल्याचेही उघड झाले आहे.
सध्या दिव्यांशी चौधरी पोलिसांच्या ताब्यात असून तिच्या गुन्हेगारी नेटवर्कचा माग काढण्यासाठी तपासाचे चक्र वेगाने फिरत आहे. कानपूर पोलिसांनी या प्रकरणाला गंभीर गुन्हेगारी रॅकेटचे स्वरूप असल्याचे नमूद केले आहे.