शिवसेना (ठाकरे गट) नेते अडचणीत; माजी खासदार उन्मेष पाटील यांच्यासह चौघांवर फसवणुकीचा गुन्हा
पोलीस महानगर नेटवर्क
जळगाव : शिवसेना (ठाकरे गट) चे नेते व माजी खासदार उन्मेष भैय्यासाहेब पाटील यांच्यासह चौघांविरुद्ध तब्बल ५ कोटी ३३ लाख रुपयांच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. देवगिरी नागरी सहकारी बँकेची फसवणूक केल्याच्या प्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात ही नोंद करण्यात आली असून, यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
फिर्यादी बँकेचे चाळीसगाव शाखा व्यवस्थापक जीवन राजूरकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, उमंग व्हाईट गोल्ड प्रा. लि. या कंपनीने औद्योगिक कर्ज घेतले होते. मात्र, परतफेड न केल्याने हे कर्ज एनपीए (थकबाकीदार) झाले. बँकेकडून परतफेडीसाठी मुदतवाढ व संधी दिल्यानंतरही रक्कम न फेडता, कंपनीच्या संचालकांनी गहाण ठेवलेली मशिनरी संगनमताने विकल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.
या प्रकरणी उन्मेष पाटील, संजय धनकवडे, प्रशांत वाघ आणि प्रमोद जाधव यांच्या विरोधात फसवणूक, विश्वासघात आणि संपत्ती विक्रीसंबंधीचे विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी उन्मेष पाटील यांच्यावर बँकांना फसवल्याचा आरोप केला होता. त्या आरोपानंतर अवघ्या तीन दिवसांतच गुन्हा दाखल झाल्याने या घडामोडीला राजकीय रंग आला आहे. नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटासाठी ही कारवाई मोठी अडचण ठरत असल्याचे राजकीय निरीक्षकांचे मत आहे.