सुमारे १० लाखांच्या दागिन्यांच्या चोरीचा संशय असलेल्या मोलकरणीची मुंबईतील पॉश सोसायटीत गळफास लावून आत्महत्या
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई – अँटॉप हिल येथील आशियाना सोसायटीमध्ये राहणाऱ्या २७ वर्षीय मोलकरणीने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी उघडकीस आली. च्योईसंग तमांग असे मोलकरणीचे नाव असून चोरीचा संशय घेतल्यामुळे तिने हे पाऊल उचलल्याचे म्हटले जात आहे.
आशियाना सोसायटीमध्ये तिसऱ्या मजल्यावर राहणाऱ्या दाम्पत्याच्या घरी तमांग मोलकरीण म्हणून घरकामाला होती. ती याच ठिकाणी वास्तव्यास असून मुळची ती दार्जिलिंगची होती. त्यांच्या घरी ती गेले २ वर्षे काम करीत होती. मंगळवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास ती घराच्या बाल्कनीमध्ये गळफास लावलेल्या स्थितीत आढळली. या घटनेची माहिती मिळताच पोलिस आशियाना सोसायटीमध्ये पोहोचले. तमांग हिला रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
तमांग काम करीत असलेल्या घरातून दागिने चोरी झाल्याचे कळते. ते तिने चोरल्याचा संशय होता. त्यामुळे ती तणावाखाली होती. त्यातूनच तिने हे पाऊल उचलल्याची चर्चा आशियाना सोसायटीमध्ये होती. याप्रकरणी अपमृत्यूची नोंद करण्यात आली. पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, तमांगच्या नातेवाइकांचे जबाब पोलिसांकडून नोंदवले जात आहेत. प्राथमिक चौकशीत कोणताही संशयास्पद प्रकार आढळलेला नाही, मात्र तपास अद्याप सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
प्राथमिक तपासानुसार, तमांग ज्या घरात काम करत होती त्या घरातून सुमारे १० लाख रुपयांचे दागिने चोरी झाल्याचे समोर आले आहे. या प्रकरणात तमांगवर संशय घेतला गेला होता. या आरोपांमुळे निर्माण झालेला ताण आणि मानसिक दबाव तिने आत्महत्येचा निर्णय घेण्यास कारणीभूत ठरल्याचे मानले जात आहे. या प्रकरणात नेमक्या कोणत्या परिस्थितीत ही घटना घडली आणि चोरीच्या संशयामागील सत्य काय आहे, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.तमांगा या ७० वर्षीय वृद्धाच्या घरी गेल्या दोन वर्षांपासून काम करत होती, त्यांच्या घरी राहत असल्यामुळे दाम्पत्यांनी तिच्यावर दागिने चोरल्याचा संशय घेतला होता.