प्रसिद्ध वकील असिम सरोदे यांची वकिली सनद तीन महिन्यांसाठी निलंबित
पोलीस महानगर नेटवर्क
मुंबई – राज्यातील प्रसिद्ध समाजसेवक आणि वकील असिम सरोदे यांच्या वकिलीची सनद तीन महिन्यांसाठी निलंबित करण्यात आली आहे. हा निर्णय बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा यांनी घेतला असून, या कारवाईमुळे विधिजगतामध्ये मोठी चर्चा सुरू झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, असिम सरोदे यांनी एका सार्वजनिक कार्यक्रमात न्यायव्यवस्था, विधानसभा अध्यक्ष आणि राज्यपालांविषयी आक्षेपार्ह विधानं केली होती. या विधानांमुळे न्यायव्यवस्थेचा अपमान झाल्याचा आरोप करत एका तक्रारदाराने बार कौन्सिलकडे तक्रार दाखल केली होती.
या प्रकरणाची सुनावणी ॲडव्होकेट विवेकानंद घाटगे यांच्या अध्यक्षतेखालील समितीसमोर झाली. समितीने सर्व दृकश्राव्य पुरावे तपासून सरोदे यांनी “राज्यपाल फालतू आहेत” आणि “न्यायव्यवस्था सरकारच्या दबावाखाली काम करत आहे” अशी वक्तव्ये केल्याचे नमूद केले.
तक्रारदाराने यापूर्वी सरोदे यांना १९ मार्च २०२४ रोजी लेखी माफी मागण्याची संधी दिली होती, मात्र त्यांनी ती संधी नाकारली. परिणामी, तक्रारदाराने त्यांची सनद रद्द करण्याची मागणी केली होती.
सरोदे यांच्या वक्तव्यांमुळे न्यायालयांविषयी नागरिकांमध्ये अविश्वास निर्माण होऊ शकतो, असा निष्कर्ष नोंदवत बार कौन्सिलने अखेर तीन महिन्यांच्या निलंबनाचा निर्णय घेतला आहे.
या निर्णयानंतर असिम सरोदे यांनी अद्याप अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. तथापि, या कारवाईनंतर राज्यातील कायदेपंडित व सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये याविषयी विविध प्रतिक्रिया उमटत आहेत.