आर्थिक गुन्हे शाखेतील उपनिरीक्षक प्रमोद रवींद्र चिंतामणी याचा खळबळजनक प्रताप; तब्बल ४६ लाख ५० हजार रुपयांची लाच घेताना अटक
योगेश पांडे / वार्ताहर
पुणे – पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील आर्थिक गुन्हे शाखेत कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक प्रमोद रवींद्र चिंतामणी याला एका आरोपीला जामीन मिळवून देण्यासाठी तब्बल ४६ लाख ५० हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहाथ अटक केली आहे. एका गंभीर प्रकरणात जामीन मिळवून देण्यासाठी त्याने २ कोटी रुपयांची लाच मागितली होती. तक्रारदार वकिलांनी एसीबीकडे धाव घेतल्यानंतर सापळा रचून चिंतामणी याला अटक करण्यात आली असून या घटनेमुळे पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे.
उपनिरीक्षक प्रमोद रवींद्र चिंतामणी हा पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील आर्थिक गुन्हे शाखेत कार्यरत आहे. एका आरोपीला जामीन मिळवून देण्याच्या बदल्यात त्याने मोठी लाच मागितली. ही लाच घेताना त्याला एसीबीने बेड्या ठोकल्या. ही कारवाई रविवारी रास्ता पेठेत करण्यात आली असून या प्रकरणी समर्थ पोलीस ठाण्यात त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारदार वकील एका आरोपीच्या वतीने न्यायालयात केस लढवत होते. सदर आरोपीवर बावधन पोलीस ठाण्यात फसवणूक व कागदपत्रांची बनावटगिरी यांसारखे गंभीर गुन्हे दाखल होते. या गुन्ह्यांचा तपास पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे होता. या प्रकरणात आरोपीचे वडील न्यायालयीन कोठडीत होते. उपनिरीक्षक प्रमोद चिंतामणी याने आरोपीच्या वडिलांना जामीन मिळवून देण्यासाठी व त्यांच्या अर्जावर म्हणणे सादर करण्यासाठी वकिलाकडे थेट दोन कोटी रुपयांची लाच मागितली. यापैकी एक कोटी रुपये स्वतःसाठी आणि एक कोटी रुपये वरिष्ठ अधिकाऱ्यांसाठी आहेत, असं सांगण्यात आलं.
दरम्यान, लाचेची एवढी मोठी मागणी ऐकून तक्रारदार वकील हादरले. त्यांनी लगेच एसीबीकडे जाऊन तक्रार केली. एसीबीच्या पथकाने या तक्रारीची पडताळणी केली आणि त्यानंतर त्यांनी सापळा रचण्याची योजना आखली. उंटाड्या मारुती मंदिराशेजारी सापळा रचण्यात आला. या सापळ्यात उपनिरीक्षक प्रमोद चिंतामणी याला लाचेच्या रकमेचा पहिला हप्ता म्हणून ४६ लाख ५० हजार रुपये स्वीकारताना पकडण्यात आले. चिंतामणी याच्यावर भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार कारवाई करण्यात आलीअसून या घटनेमुळे संपूर्ण पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणामुळे पोलीस यंत्रणेतील भ्रष्टाचाराबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.