एकनाथ खडसे यांच्या घरफोडी प्रकरणातील दोन आरोपी उल्हासनगरमधून अटकेत; तीन मुख्य आरोपी फरार
योगेश पांडे / वार्ताहर
जळगाव – ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या जळगाव येथील घरातील चोरी प्रकरणातील दोन आरोपींना उल्हासनगरमधून अटक करण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. अटक आरोपींमध्ये चिराग सय्यद आणि कैलास खंडेलवाल यांचा समावेश असून, त्यांनी चोरीचा मुद्देमाल एकमेकांकडे सुपूर्द केल्याचे समोर आले आहे.
मात्र, प्रत्यक्ष घरफोडी करणारे एजाज अहमद, मोहम्मद बिलाल आणि बाबा हे तिघे सराईत गुन्हेगार अद्याप फरार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी दिली.
चोरीच्या घटनेत ३५ हजार रुपये आणि सात ते आठ तोळे सोन्याचे दागिने लंपास करण्यात आले होते. अटक आरोपींकडून मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, खडसे यांनी उल्लेख केलेली कागदपत्रे, सीडी किंवा पेन ड्राइव्ह आढळली नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
दिवाळीच्या सुट्टीत खडसे कुटुंब बाहेरगावी असताना, त्यांच्या शिवरामनगर येथील बंगल्यात ही चोरी झाली होती. या प्रकरणामुळे जळगाव शहरात एकच खळबळ उडाली आहे.