पनवेलमध्ये आठवडाभरात दुसरी महिला आत्महत्या; फॉरेक्स गुंतवणुकीच्या आमिषाने कुटुंबाची फसवणूक

Spread the love

पनवेलमध्ये आठवडाभरात दुसरी महिला आत्महत्या; फॉरेक्स गुंतवणुकीच्या आमिषाने कुटुंबाची फसवणूक

पोलीस महानगर नेटवर्क 

पनवेल – हुंडाबळीच्या प्रकरणाने हादरलेल्या पनवेल शहरात आणखी एका महिलेच्या आत्महत्येने खळबळ उडाली आहे. फॉरेक्स मार्केटमध्ये गुंतवणुकीचे आमिष दाखवून तब्बल ५ कोटी ३० लाख रुपयांची फसवणूक झाल्यामुळे निर्माण झालेल्या आर्थिक व मानसिक तणावाला कंटाळून ३६ वर्षीय विवाहित महिलेनं आत्महत्या केली. ही घटना पनवेल शहरातील बालाजी आंगण इमारतीत घडली.

सदर महिला आपल्या पती व दोन मुलांसोबत राहत होती. ८ ऑक्टोबर रोजी सकाळी तिने मुलांना शाळेत पाठवून पतीला ‘मुलांसाठी जेवण तयार केलं’ असा फोटो पाठवला होता. मात्र त्यानंतर तिच्याशी संपर्क साधता आला नाही. दुपारी शाळेतून परतलेल्या मुलांना आईने गळफास घेतल्याचे दिसून आले. पती बाहेरगावी असल्याने नातेवाईकांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली.

सुरुवातीला ही घटना मानसिक तणावातून केलेली आत्महत्या असल्याचे मानले जात होते. परंतु नंतर मृत महिलेने नातेवाईकांकडून उसने पैसे मागितल्याची माहिती समोर आल्यानंतर कुटुंबीयांनी तिच्या खात्याची चौकशी केली असता मोठ्या प्रमाणावर संशयास्पद व्यवहार आढळले.

याबाबत पिडीतेचे वडील (वय ६५) यांनी पनवेल शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, गुजरातमधील सुरेंद्रनगर येथील रवी हरेशभाई भडका या व्यक्तीविरुद्ध महाराष्ट्र आत्महत्या प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

तक्रारीनुसार, भडका याने २०२३ पासून फॉरेक्स गुंतवणुकीच्या नावाखाली फिर्यादीच्या कुटुंबाचा विश्वास संपादन केला. सुरुवातीला काही रक्कम परत देऊन विश्वास जिंकला आणि नंतर तब्बल ५.३० कोटी रुपये गुंतवणुकीच्या नावाखाली घेतले. मात्र, त्यानंतर कोणताही परतावा न देता उलट पिडीतेवर पैशांसाठी दबाव आणत तिला मानसिक छळ दिला. अखेर या तणावाला कंटाळूनच तिने आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलले.

या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलिस आयुक्त भाऊसाहेब ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे आणि सहाय्यक निरीक्षक प्रविण फडतरे करत आहेत.

पनवेल शहरात केवळ आठवड्याभरात दोन महिलांनी आणि एका तरुण विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याने शहरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. आर्थिक फसवणूक, मानसिक आरोग्य व महिला सुरक्षेबाबत ठोस उपाययोजनांची मागणी नागरिकांकडून होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon