नाशिकच्या कारागृहात अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केलेल्या
कैद्याने गळफास घेत संपवलं जीवन
योगेश पांडे / वार्ताहर
नाशिक – नाशिकरोड येथील मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या एका बंदीवानाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना रविवारी दुपारच्या सुमारास उघडकीस आली. शिवदास भालेराव (५८) असे मृत्युमुखी पडलेल्या बंदीवानाचे नाव आहे.
सिन्नर तालुक्यातील रहिवासी असलेले भालेराव याला एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी पोलिसांनी अटक केली होती. या गुन्ह्यात त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती आणि जून २०२४ पासून तो नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत होता.
रविवारी दुपारच्या सुमारास भालेराव याने कारागृहातील एका ठिकाणी कशाच्या तरी साहाय्याने गळफास घेतल्याचे कारागृह प्रशासनाच्या लक्षात आले. घटनेची माहिती मिळताच कारागृहातील पोलीस अंमलदारांनी तातडीने त्यांना खाली उतरवून शासकीय जिल्हा रुग्णालयात सव्वा तीनच्या सुमारास दाखल केले. मात्र, तेव्हा वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून कैद्याला मृत घोषित केले.
या घटनेची नाशिकरोड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलीस आणि कारागृह प्रशासन या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. मात्र, या घटनेमुळे नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात एकच खळबळ उडाली आहे.