जोगेश्वरीत अग्नितांडव; जेएमएस बिझनेस सेंटरचे ४ मजले जळून खाक; १७ जणांची सुटका

Spread the love

जोगेश्वरीत अग्नितांडव; जेएमएस बिझनेस सेंटरचे ४ मजले जळून खाक; १७ जणांची सुटका

योगेश पांडे / वार्ताहर

मुंबई – मुंबईत पुन्हा एकदा आगीचा कहर पाहायला मिळाला. जोगेश्वरी पश्चिम येथील जेएमएस बिझनेस सेंटर या उंच इमारतीत गुरुवारी सकाळी भीषण आग लागून मोठे नुकसान झाले. या घटनेत १७ जणांची सुखरूप सुटका करण्यात आली असून, पाच ते सहा जण किरकोळ जखमी झाले आहेत. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

गुरुवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास ही आग लागली. सुरुवातीला सातव्या मजल्यावरून सुरुवात झालेली आग, काही क्षणांतच आठव्या, नवव्या आणि दहाव्या मजल्यांपर्यंत पसरली. आगीच्या लाटेमुळे इमारतीतील अनेक नागरिक अडकले होते. काहींनी कपड्याला लपेटून धूर आणि ज्वाळांपासून बचावाचा प्रयत्न केला.

अग्निशमन दलाच्या ५ ते ६ गाड्या आणि ४ वॉटर टँकर्स घटनास्थळी दाखल होऊन, चार तासांच्या अथक प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणण्यात यश आले.

घटनास्थळी झालेल्या प्राथमिक चौकशीतून समोर आले की, जेमएस बिझनेस सेंटरला ऑक्युपन्सी सर्टिफिकेट (ओसी) नसतानाही येथे मोठ्या प्रमाणावर गोदामे आणि कॉर्पोरेट ऑफिस भाड्याने देण्यात आले होते. स्थानिक नागरिकांनी बीएमसीच्या दुर्लक्षामुळे ही दुर्घटना घडली, असा आरोप केला आहे.

या प्रकरणी ओशिवरा पोलिसांनी तपास सुरू केला असून, इमारतीचा डेव्हलपर व संबंधित अधिकारी यांच्यावर कारवाईची शक्यता आहे.

या आगीत जखमी झालेल्यांना जोगेश्वरी ट्रॉमा केअर रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, सर्वांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळाली आहे.
दरम्यान, शिवसेना (शिंदे गट) खासदार रवींद्र वायकर यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला आणि आग नियंत्रण कार्यात तत्परतेने सहभागी झालेल्या अग्निशमन दलाचे कौतुक केले.

आग लागताच संपूर्ण परिसरात धुराचे प्रचंड लोट पसरले. बेहरामपाडा येथील गांधी शाळेजवळील एस.व्ही. रोडवरील या इमारतीतून आगीच्या लाटा उठताना पाहून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं. अडकलेल्यांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी फायर ब्रिगेडने क्रेन आणि हायड्रॉलिक लॅडरचा वापर केला. काहींना खिडक्यांमधून बाहेर काढण्यात आलं.

आग नेमकी कशामुळे लागली याचं कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. प्राथमिक तपासात शॉर्ट सर्किटची शक्यता वर्तवली जात आहे. अग्निशमन दल आणि बीएमसीचे अधिकारी या घटनेचा सविस्तर तपास करत आहेत.

मुंबईत गेल्या काही महिन्यांपासून आगीच्या घटना वाढल्याचे चित्र दिसत आहे. ओसी नसलेल्या व्यावसायिक इमारतींमध्ये सुरक्षा उपायांची घोर कमतरता असल्याने नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण होत आहे.
जोगेश्वरीतील ही आग प्रशासनासाठी मोठा इशारा ठरली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon