संभाजीनगरमध्ये सभापती निवडीपूर्वी राडा; अंबादास दानवेंनी पकडली भाजप नेत्याची कॉलर
योगेश पांडे / वार्ताहर
छत्रपती संभाजीनगर – राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्येही भाजप महायुतीने मोठं यश मिळवलं असून भाजपने सर्वाधिक जागा जिंकल्या आहेत. तर, शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादीही अनुक्रमे दुसऱ्या, तिसऱ्या क्रमांकावर आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेतही भाजपने बहुमत मिळवले आहे. मात्र, संभाजीनगर पंचायत समितीवर भाजपला एकहाती सत्ता स्थापन करता येणार नाही. याच पंचायत समितीच्या सभापती-उपसभापति निवडीवरुन भाजप आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे कार्यकर्ते भिडल्याचं पाहायला मिळालं. यावेळी, उबाठाचे नेते तथा माजी आमदार अंबादास दानवे यांनी भाजपच्या कल्याणराव गायकवाडांची कॉलर पकडल्याचं दिसून आलं.
छत्रपती संभाजीनगर पंचायत समिती निवडणुकीच्या सभापती आणि उपसभापतींची निवड सोमवारी पार पडली. त्याच पार्श्वभूमीवर सोमवारी निवडीपूर्वीच उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना आणि भाजपचे कार्यकर्ते आमने-सामने आले, दोघांमध्ये शाब्दिक चकमक झाली अन् ते एकमेकांच्या अंगावरही धावून गेले. यावेळी, माजी विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांनी भाजपच्या कल्याण गायकवाड यांची कॉलर पकडल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. छत्रपती संभाजीनगर पंचायत समिती निवडणुकीत सभापतीपदासाठी भाजपकडून कल्याण गायकवाड यांनी अर्ज दाखल केला आहे.
दरम्यान, छत्रपती संभाजीनगर पंचायत समिती निवडणूक होत असून सभापतीपदासाठी २० पैकी ११ जागांची गरज आहे. भाजपकडे ७ तर शिंदेंच्या शिवसेनेकडे ६ जागा आहेत. त्यामुळे, येथील सभापतीपदसाठी भाजपला ४ जागांची गरज आहे. तर, जो पक्ष उपसभापतीपद आपल्याला देईल, त्यांना पाठिंबा देण्याची भूमिका ठाकरेंच्या शिवसेनेनं घेतली आहे. त्यामुळे, येथे दोन शिवसेना एकत्र येतील, अशी परिस्थिती निर्माण झाल्याचं दिसून आलं.