जय अंबेनगरमध्ये नैसर्गिक तलावाची भरणी; झोपडी माफियांचा अड्डा उघड!
मनपा व पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह; नागरिक संतप्त
पोलीस महानगर बातमीचा इम्पॅक्ट
रवि निषाद / मुंबई
मुंबई – मुंबई उपनगरातील चेंबूर परिसरात पुन्हा एकदा पर्यावरणाचा गंभीर प्रश्न उभा राहिला आहे. एम-पश्चिम विभागातील घाटकोपर-मानखुर्द लिंक रोडलगत असलेल्या जय अंबेनगर परिसरातील सुमारे ७० वर्षे जुन्या नैसर्गिक तलावाची भरणी करून काही झोपडीमाफियांनी बेकायदेशीर बांधकामांना सुरुवात केल्याचे धक्कादायक वास्तव उघड झाले आहे.
स्थानिकांच्या माहितीनुसार, हा तलाव परिसरातील पावसाळी पाण्याचा निचरा करण्यासाठी महत्त्वाचा जलसाठा म्हणून कार्यरत होता. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून काही माफियांकडून या तलावात मुरूम आणि बांधकामातील अवशेष टाकून जमिनीची बेकायदेशीर भर घालण्यात येत आहे.
संगम, सफलता, आश्रय, पिकनिक पॉइंट, रॉयल आणि समृद्धी लॉजिंगच्या मागील भागात हे अवैध बांधकाम सुरू असल्याचे स्थानिकांनी सांगितले.
“ही कामे अक्षरशः दिवसाढवळ्या सुरू आहेत. मनपा व पोलिस यंत्रणा याबाबत डोळेझाक करत आहे. तलाव संपला तर पुढच्या पावसात इथला निचरा कोसळेल,” अशी तीव्र प्रतिक्रिया एका नागरिकाने दिली.
स्थानिक सूत्रांच्या म्हणण्यानुसार, या बेकायदेशीर भरणीमागे दिवाकर उर्फ सोनई प्रजापती व त्याचा साथीदार अमजद यांची नावे पुढे आली आहेत. दिवाकर हा परिसरातील कुख्यात झोपडामाफिया म्हणून ओळखला जातो. तो बाहेरगावाहून कामगार आणून तलाव भरणे आणि झोपड्या उभारण्याचे काम करवतो, असा आरोप स्थानिकांनी केला आहे.
एका रहिवाशाने सांगितले, “दिवाकर प्रजापतीचा पोलिस व मनपा अधिकाऱ्यांशी चांगला संपर्क आहे. त्यामुळे कोणीही उघडपणे त्याच्याविरोधात बोलण्यास घाबरते.
टिळकनगर पोलिस ठाण्यातील एका अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, “दिवाकर हा प्रभावशाली आणि चलाख आहे. त्याच्याविरोधात तक्रारी आल्या तरी त्यावर फारशी कारवाई होत नाही.” काही महिन्यांपूर्वी त्याच्याविरोधात दाखल झालेल्या तक्रारीवर फक्त नोटीस देऊन प्रकरण थंडावल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
दरम्यान, मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगरानी आणि पूर्व उपनगरचे अतिरिक्त आयुक्त अमित सैनी यांनी “पोलिस महानगर”च्या वृत्तानंतर तत्काळ चौकशीचे आदेश दिल्याचे सूत्रांकडून समजते. अमित सैनी यांनी संबंधित अधिकाऱ्यांना अवैध बांधकाम निष्काषित करून तलावाचे मूळ स्वरूप पुनर्स्थापित करण्याचे निर्देश दिल्याचे कळते.
पर्यावरणप्रेमींनी इशारा दिला आहे की, “जर ही भरणी थांबवली नाही, तर आगामी पावसाळ्यात जय अंबेनगर परिसरात जलनिकासी व्यवस्था पूर्णतः कोलमडेल आणि गंभीर पूरस्थिती निर्माण होऊ शकते.”
नागरिकांनी या प्रकरणात तातडीने हस्तक्षेप करून तलाव वाचवण्याची मागणी केली आहे.
नागरिकांची मागणी
तलाव भरणी तात्काळ थांबवावी
सर्व बेकायदेशीर झोपड्या हटवाव्यात
दिवाकर प्रजापतीसह संबंधितांवर गुन्हे दाखल करावेत
तलावाचा मूळ नकाशा जतन करून पुनर्स्थापना करावी