प्रेमातील संशय, राग आणि हातोड्याचा घाव; अलिबाग हादरले!
पोलीस महानगर नेटवर्क
रायगड – अलिबाग तालुक्यातील कनकेश्वर मंदिर परिसरात प्रेमसंबंधातून एक धक्कादायक घटना घडली आहे. प्रेयसी दुसऱ्या तरुणाशी बोलत असल्याच्या संशयातून एका तरुणाने आपल्या प्रेयसीवर हातोडा आणि दगडाने जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात ती तरुणी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरज शशिकांत बुरांडे (वय २८, रा. वरसोलपाडा, थेरॉडा बाजारपेठ, ता. अलिबाग) असे आरोपीचे नाव असून, त्याने संचिता विनायक सलामत (वय २१, रा. थेरॉडा बाजारपेठ) हिच्यावर हातोड्याने वार करून ठार मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना शुक्रवारी कनकेश्वर मंदिराजवळील वडाच्या झाडाखाली घडली.
दोघे मंदिर परिसरात बसले असताना सुरजने अचानक बॅगेतून लोखंडी हातोडा काढला आणि संचिताच्या डोक्यावर व कपाळावर सपासप घाव घातले. इतक्यावरच न थांबता त्याने तिला जवळच्या तारेच्या जाळीत ओढून नेले आणि दगडानेही मारहाण केली. गंभीर जखमी अवस्थेत संचिता जमिनीवर कोसळली असतानाही आरोपीने तिला जवळपास तीन तास तिथेच पडू दिले.
घटनेची माहिती मिळताच अलिबाग पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत आरोपीला ताब्यात घेतले. संचिता हिला अलिबाग जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिची प्रकृती चिंताजनक आहे.
या प्रकरणी अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा र. क्र. १८४/२०२५ भा.दं.सं. कलम ३०७ (हत्या प्रयत्न) तसेच इतर संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास अलिबाग पोलीस करत आहेत.