नोकरीचे आमिष दाखवून तरुणांची कोट्यवधींची फसवणूक; मुंबई आर्थिक गुन्हे शाखेची दिल्लीमध्ये धडक कारवाई

Spread the love

नोकरीचे आमिष दाखवून तरुणांची कोट्यवधींची फसवणूक; मुंबई आर्थिक गुन्हे शाखेची दिल्लीमध्ये धडक कारवाई

पोलीस महानगर नेटवर्क 

मुंबई – केंद्र आणि राज्य सरकारी विभागात नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवून कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या एका भामट्याला मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने दिल्लीमधून बेड्या ठोकल्या आहेत. निलेश राठोड (३३) असे या आरोपीचे नाव असून, त्याने आतापर्यंत ६० हून अधिक तरुणांना बनावट नियुक्तीपत्रे देऊन तब्बल तीन कोटी रुपयांची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे.

🔴 “सनदी अधिकारी” असल्याचा बनाव करून तरुणांची फसवणूक

अकोला जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील रहिवासी निलेश राठोड स्वत:ला केंद्र सरकारचा सनदी अधिकारी असल्याचे भासवत होता. राज्य आणि केंद्र सरकारच्या विविध विभागात नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली तो प्रत्येकी ५ ते १५ लाख रुपये आकारत असे. वैद्यकीय चाचण्या आणि बोगस नियुक्तीपत्रांच्या माध्यमातून तो तरुणांना पूर्णपणे दिशाभूल करीत होता.

या प्रकरणी तक्रार मिळताच आर्थिक गुन्हे शाखेने गुन्हा नोंदवला आणि विशेष तपास पथक तयार करण्यात आले. आरोपीची पत्नी नवी दिल्ली येथे राहत असल्याची माहिती मिळताच, सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन पवार, उपनिरीक्षक मंदार राणे आणि सचिन निकम यांनी दिल्लीच्या द्वारका मोड परिसरात गुप्त पाळत ठेवून सापळा रचला. शेवटी तांत्रिक तपास आणि गुप्त बातमीदारांच्या मदतीने आरोपीला अटक करण्यात आली.

राठोडविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१८(४), ३१९(२), ३३६(२), ३३६(३), ३३८ आणि ३४०(२) अंतर्गत गुन्हे दाखल आहेत. मुंबई, पुणे, अकोला, वाशीसह महाराष्ट्रातील तसेच इतर राज्यांमध्येही त्याच्याविरोधात फसवणुकीचे अनेक गुन्हे नोंदले गेले आहेत. सध्या समोर आलेल्या तक्रारीनुसार त्याने सुमारे पावणे तीन कोटी रुपयांची फसवणूक केली असली, तरी ही रक्कम १० कोटी रुपयांपर्यंत पोहोचण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

फसवणुकीतून कमावलेल्या कोट्यवधी रुपयांचा वापर आरोपीने ऐषआरामी जीवनशैली आणि मनोरंजन उद्योगात गुंतवणुकीसाठी केला. या रकमेच्या माध्यमातून त्याने दोन मराठी चित्रपटांची निर्मिती केल्याची माहिती तपासात उघड झाली आहे.

ही कारवाई आर्थिक गुन्हे शाखेचे उपायुक्त निमित्त गोयल, सहाय्यक आयुक्त राजेश ओझा, आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मराठे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

> “आरोपी अत्यंत चलाख आणि धूर्त आहे. त्याने विविध जिल्ह्यांतील शेकडो तरुणांना नोकरीचे आमिष दाखवून फसवले आहे. त्याच्याकडून आणखी मोठ्या रकमेचा घोटाळा उघड होण्याची शक्यता आहे,”

असे पोलिसांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon