पुण्यातील बंदू आंदेकर टोळीला मोठा धक्का; चमडी गल्लीतील स्वप्नीलसह अमित बहादूरकरला अटक करण्यात यश
योगेश पांडे / वार्ताहर
पुणे – पुणे शहरात आंदेकर टोळ्यांनी गँगवार सुरु केल्याने पोलिसांनी आरोपींच्या मुसक्या आवळायला सुरुवात केली आहे. आंदेकर टोळीतील आरोपींनी ५ सप्टेंबर रोजी आयुष कोमकरची गोळ्या झाडून हत्या केली होती. त्यानंतर पोलिसांनी बंदू आंदेकरसह त्याच्या टोळीत काम करणाऱ्या गुंडांना अटक केली होती. याप्रकरणात काही आरोपींवर मकोकाही लावण्यात आला आहे. तसच पुणे शहर पोलिसांकडून फरार आणि तडीपार आरोपींसाठी शोधमोहीम सुरु करण्यात आली होती.
फरासखाना पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर नंबर १८२/२०२५ अंतर्गत आयपीसी कलम ३०८, ३०८ (४),१११,३(५) व मकोका क्रमांक ३ (१) (ii) व ३(४) अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला होता. अमित सुधाकर बहादूरकर (३६), स्वप्नील विलास बहादूरकर (३७) अशी आरोपींची नावं असून पोलिसांनी त्यांच्यावर अटकेची कारवाई केली आहे. यामुळे पुण्यातील बंदू आंदेकर टोळीला मोठा धक्का बसला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुणे हडपसर येथील सातववाडी दत्तमंदिराजवळ आरोपी अमित सुधाकर बहादूरकर आणि स्वप्नील विलास बहादूरकरला चमडी गल्ली येथून पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलं. अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) पंकज देशमुख, पोलीस उप-आयुक्त (गुन्हे), निखील पिंगळे, विजय कुंभार सह पोलीस आयुक्त १,(गुन्हे शाखा ) यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथक १, गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक छगन कापसे, सह पोलीस निरीक्षक राजेश माळेगावे, पोलीस उप-निरीक्षक रामेश्वर पार्वे, पोलीस प्रविण ढमाळ, रणजित फडतरे, नितीन कांबळे, अमोल आवाड, दुर्योधन गुरव, राजेंद्र लांडगे, बालरफी शेख, रहिम शेख, अमर पवार आणि मंगेश गुंड यांनी आरोपींना ताब्यात घेण्याची धडक कारवाई केली.
आयुष कोमकर हत्या प्रकरणात पुणे पोलिसांनी आंदेकर टोळीतील आरोपींच्या मुसक्या आवळल्या. याप्रकरणी पोलिसांनी कुख्यात गुंड बंडू आंदेकरला अटक केली. तसच त्याच्या १३ सहकाऱ्यांवरही पोलिसांनी अटकेची कारवाई केली. बंदू आंदेकर टोळीनं ज्या ठिकाणी अनधिकृत बांधकाम केलं होतं, त्या बांधकामांवरही पोलिसांनी मोठी कारवाई केल्याचं समजते. ‘बदला तो फिक्स, रिप्लाय होगा’ अशाप्रकारचा धमकीचा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल करणाऱ्या पाच आरोपींनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं.