कुशीनगर एक्स्प्रेसच्या भीषण गर्दीने घेतला प्रवाशाचा बळी
योगेश पांडे / वार्ताहर
कल्याण – मुंबई-लोकमान्य टिळक टर्मिनस येथून सुटलेल्या कुशीनगर एक्स्प्रेसमधील भीषण गर्दीमुळे एका ३२ वर्षीय प्रवाशाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दिवाळीनिमित्त लांब पल्ल्याच्या रेल्वेला होणारी प्रचंड गर्दी पुन्हा एकदा प्रवाशांच्या जीवावर बेतल्याचे या घटनेने सिद्ध झाले आहे.
शादाब खान असे मयत तरुणाचे नाव आहे. तो मूळचा उत्तर प्रदेशातील फैजाबादचा रहिवासी असून, मुंबईतील नागपाडा परिसरातील एका हॉटेलमध्ये काम करत होता. शादाबने गुरुवारी रात्री मुंबई लोकमान्य टिळक टर्मिनस येथून आपल्या गावी जाण्यासाठी कुशीनगर एक्स्प्रेस पकडली होती.ही एक्स्प्रेस शहाड आणि आंबिवली रेल्वे स्थानकांदरम्यान रात्री सुमारे १:३० वाजताच्या सुमारास पोहोचली. रेल्वेमध्ये प्रवाशांची प्रचंड गर्दी होती. या गर्दीमुळे झालेल्या धक्क्यामुळे किंवा तोल गेल्याने शादाब खान चालत्या गाडीतून खाली पडला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच कल्याण रेल्वे पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. शादाबचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी कल्याण डोंबिवली महापालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.रेल्वे पोलिसांनी त्याच्या मृत्यूची माहिती उत्तर प्रदेशातील त्याच्या नातेवाईकांना दिली आहे. शादाबच्या मृत्यूची बातमी कळताच त्याच्या हॉटेल मालकानेही रुक्मिणीबाई रुग्णालयात धाव घेतली. केवळ गर्दीमुळे शादाबला आपला जीव गमवावा लागला असल्याने रेल्वे प्रवासी संघटनांकडून या घटनेबद्दल तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.