पुण्यातील एनडीए मध्ये शिकणाऱ्या माजी सैनिकाच्या मुलाचं टोकाचं पाऊल; वसतीगृहातील खोलीत गळफास घेत केली आत्महत्या
योगेश पांडे / वार्ताहर
पुणे – राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एनडीए)या प्रतिष्ठित संस्थेत एका विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अंतरीक्ष कुमार (१८) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव असून, तो मूळचा उत्तर प्रदेशातील लखनौ जिल्ह्याचा रहिवासी आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली. मिळालेल्या माहितीनुसार, अंतरीक्ष कुमार हा माजी सैनिकाचा मुलगा होता. त्याचे वडील भारतीय सैन्यात सेवेत होते. वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत देशसेवेचे स्वप्न घेऊन अंतरीक्षने जुलै महिन्यात पुण्यातील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीमध्ये प्रवेश घेतला होता. तो सध्या पहिल्या सत्रात शिक्षण घेत होता.
शुक्रवारी पहाटेच्या सुमारास अंतरीक्षने आपल्या वसतिगृहातील खोलीत बेडशीटच्या साहाय्याने गळफास घेत आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच एनडीए प्रशासनाने तातडीने उत्तमनगर पोलिसांना कळवले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. या घटनेमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. प्राथमिक तपासात कोणतेही संशयास्पद पत्र (सुसाईड नोट) सापडलेले नाही. पोलिस विद्यार्थी मित्र, प्रशिक्षक आणि अधिकाऱ्यांकडून चौकशी करून मानसिक ताण, शैक्षणिक दबाव किंवा वैयक्तिक कारणे होती का, याचा शोध घेत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, शुक्रवारी पहाटे त्याने त्याच्या खोलीतील बेडशीटने गळफास लावून स्वतःचे जीवन संपवले. आत्महत्या नेमकी त्याने का केली याचे कारण समजू शकलेले नाही. याची माहिती मिळताच पोलिसांना कळवण्यात आले. पोलिसांनी सध्या मृतदेह ताब्यात घेतला आहे. तसेच अंतरिक्षच्या कुटुंबालाही माहिती देण्यात आली.अंतरिक्षने आत्महत्या का केली? आत्महत्या करण्यामागचं कारण काय? याचा तपास सुरू आहे. त्याच्या खोलीतून सुसाईड नोटही सापडली नाही. सध्या उत्तमनगर पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे. या घटनेनंतर अतंरिक्ष कुमार या तरूणाच्या कुटुंबावर दुखा:चा डोंगर कोसळला आहे.