सत्ताधारी पक्षाच्या आमदाराला ‘हनी ट्रॅप’मध्ये अडकविण्याचा प्रयत्न; ठाण्यात गुन्हा दाखल

Spread the love

सत्ताधारी पक्षाच्या आमदाराला ‘हनी ट्रॅप’मध्ये अडकविण्याचा प्रयत्न; ठाण्यात गुन्हा दाखल

पोलीस महानगर नेटवर्क

ठाणे – राज्यातील एका सत्ताधारी पक्षाशी संलग्न आमदाराला ‘हनी ट्रॅप’मध्ये अडकवून आर्थिक उकळपट्टी करण्याचा प्रयत्न झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी आमदारांनी स्वतः तक्रार दाखल केल्यानंतर ठाणे जिल्ह्यातील एका पोलीस ठाण्यात माहिती तंत्रज्ञान अधिनियम, २००० मधील कलम ६७ आणि भारतीय न्याय संहिता (बीएनएस), २०२३ चे कलम ३०८ नुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

मैत्रीच्या बहाण्याने सुरू झाला सापळा

तक्रारीनुसार, आमदारांना २०२४ मध्ये त्यांच्या व्हॉट्सॲप क्रमांकावरून एका महिलेने वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. सुरुवातीला त्यांनी या कॉलकडे दुर्लक्ष केले, मात्र सतत संपर्क येत राहिल्याने त्यांनी अखेर कॉल स्वीकारला. त्यावेळी संबंधित महिलेने आमदारांशी मैत्री करण्याची इच्छा व्यक्त केली आणि त्यांच्याशी संवाद सुरू ठेवला.

काही दिवसांनंतर आमदारांनी त्या महिलेचा त्रास वाढल्याने तिला ब्लॉक केले. परंतु, विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान तिने दुसऱ्या क्रमांकावरून पुन्हा संपर्क साधत अश्लील छायाचित्रे आणि संदेश पाठवण्यास सुरुवात केली.

पैशांची उकळपट्टी आणि धमकी

महिलेने आमदारांकडून पाच ते दहा लाख रुपयांची मागणी केली. पैसे न दिल्यास ती पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करेल आणि त्यांची राजकीय प्रतिमा मलिन करेल, अशी धमकी तिने दिली.

या सततच्या त्रासानंतर आमदारांनी स्वतः पोलीस ठाण्यात हजेरी लावून तक्रार दाखल केली. प्राथमिक तपासानुसार, संबंधित महिला वेगवेगळ्या मोबाईल क्रमांकांचा वापर करून आमदारांना लक्ष्य करत होती.

पोलिसांचा तपास सुरू

या प्रकरणी ठाणे पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली आहे. प्राथमिक तपासात सायबर हनी ट्रॅपचा कोन स्पष्ट होत असून, आरोपी महिलेचा शोध घेण्यासाठी तांत्रिक तपास सुरू आहे.

राजकारण्यांना लक्ष्य करणाऱ्या हनी ट्रॅप रॅकेटचा हा आणखी एक प्रकार ठाणे पोलिसांसमोर उघडकीस आला असून, तपास यंत्रणा सध्या पूर्ण ताकदीने या प्रकरणाच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon