डोंबिवलीत पैशाच्या वादातून दोन गटात राडा; तरुणाला मारहाण, जीवे मारण्याची धमकी
पोलीस महानगर नेटवर्क
डोंबिवली – पैशाच्या वादातून आणि त्यानंतर झालेल्या पोलिस तक्रारीच्या पार्श्वभूमीवर बुधवारी रात्री डोंबिवली (प.) येथील उमेशनगर परिसरात दोन गटात राडा झाला. यावेळी एका तरुणाला बेदम मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकी देण्यात आली, तसेच त्याच्या वाहनाची काच फोडून नुकसान करण्यात आले.
याप्रकरणी विष्णुनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, सुजल शरद म्हात्रे (२२, रा. जया शांताराम हाइट्स, उमेशनगर) याने तक्रार दिली आहे. त्याच्या तक्रारीवरून पोलिसांनी रोमेश रतन म्हात्रे, रोचित रतन म्हात्रे आणि रोहन रतन म्हात्रे यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे.
घटना उमेशनगरमधील गावदेवी मंदिरामागे, सुजल म्हात्रे यांच्या शांताराम आर्केड कार्यालयाबाहेर घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुजल आणि रोमेश यांच्यात काही दिवसांपूर्वी पैशाचा व्यवहार झाला होता. या व्यवहारावरून दोघांमध्ये वाद निर्माण झाला. रोमेश याने सुजल याला शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी दिल्याने सुजलने यापूर्वीच पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.
या तक्रारीमुळे संतप्त झालेल्या रोमेशने बुधवारी रात्री सुजलला फोन करून पुन्हा पैशाचा विषय काढला. त्यावरून वाद वाढत गेला आणि गावदेवी मंदिरामागे प्रत्यक्ष भेट झाल्यावर रोमेश व रोचित यांनी सुजलला हाताने व बुक्क्याने मारहाण केली. त्याला जीवे ठार मारण्याची धमकी देत त्याच्या वाहनाची काच फोडली. यावेळी रोहन म्हात्रेनेही शिवीगाळ करून दगड फेकत सुजलला दुखापत केली.
या घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक कुमटकर करत आहेत. दरम्यान, डोंबिवली पश्चिमेतील एका पक्षीय कार्यालयात काही दिवसांपूर्वी रात्री झालेल्या भांडणानंतर एका ज्येष्ठ कार्यकर्त्यालाही मारहाण झाल्याची चर्चा सध्या परिसरात रंगत आहे.