दिवाळी ‘बोनस’ टाळण्यासाठी ५०% सफाई कामगारांची हकालपट्टी? मनसेच्या आक्रमकतेनंतर केडीएमसी बॅकफुटवर
योगेश पांडे / वार्ताहर
कल्याण – कल्याण-डोंबिवली महानगरपालिका प्रशासनाने ऐन दिवाळीच्या तोंडावर कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या सुमारे ५०% सफाई कामगारांना तडकाफडकी कामावरून काढून टाकल्यामुळे खळबळ उडाली. प्रशासनाच्या या निर्णयाविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) आक्रमक भूमिका घेतली. मनसेनं कामगारांच्या पाठीशी ठाम उभे राहून आंदोलन केलं. अखेर, मनसेच्या इशाऱ्यानंतर केडीएमसी प्रशासनाला आपला निर्णय मागे घ्यावा लागला.
केडीएमसी प्रशासनाने अचानक कामावरून काढून टाकल्याने हवालदिल झालेल्या या कंत्राटी सफाई कामगारांनी आपली व्यथा मनसेच्या नेत्यांसमोर मांडली. त्यानंतर, मनसेचे जिल्हाध्यक्ष उल्हास भोईर यांच्या नेतृत्वाखाली सर्व कामगार केडीएमसी मुख्यालयासमोर जमा झाले आणि त्यांनी काम बंद आंदोलन सुरू केले. मनसेचे पदाधिकारी उल्हास भोईर यांनी तातडीने केडीएमसी अधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना जाब विचारला. “केडीएमसी ची ही हिटलरशाही मनसे खपवून घेणार नाही. या कामगारांना तात्काळ पुन्हा कामावर घ्या, अन्यथा मनसे तीव्र आंदोलन छेडेल,” असा स्पष्ट इशारा जिल्हाध्यक्ष भोईर यांनी दिला.
मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांवर प्रश्नांची सरबत्ती केली. “दिवाळी आली म्हणून बोनस द्यावा लागेल, या भीतीपोटी तुम्ही या गरीब कामगारांना घरी बसवत आहात का?” असा संतप्त सवाल मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी केडीएमसी अधिकाऱ्यांना विचारला. मनसेच्या आक्रमक पवित्र्यानंतर आणि तीव्र आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर केडीएमसी प्रशासनाने नमते घेतले. कंत्राटी कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर घेण्याचे आश्वासन दिल्यानंतरच मनसेने आपले आंदोलन मागे घेतले.
या निर्णयाबद्दल बोलताना केडीएमसी चे उपायुक्त रामदास कोकरे यांनी प्रशासनाची भूमिका स्पष्ट केली. “कामगारांच्या कामाच्या नियोजनामध्ये व्यवस्थितपणा आणण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला होता. कामगारांच्या कामाच्या नियोजनासंदर्भात आम्ही निर्णय घेतला आहे. मात्र, आता चर्चेनंतर सर्व प्रक्रिया केली जाईल आणि या कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर घेतले जाईल,” असे आश्वासन त्यांनी दिले.