६० कोटींच्या फसवणुकीच्या प्रकरणात शिल्पा शेट्टीची ४.३० तास चौकशी; राज कुंद्रानंतर पोलिसांची कसून तपासणी सुरू
पोलीस महानगर नेटवर्क
मुंबई – बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज कुंद्रा पुन्हा एकदा मुंबई पोलिसांच्या चौकशीत अडकले आहेत. तब्बल ६० कोटी रुपयांच्या फसवणुकीच्या प्रकरणात मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून या दोघांची सखोल चौकशी सुरू आहे.
यापूर्वी राज कुंद्राची पाच तास चौकशी केल्यानंतर, सोमवारी पोलिसांचे पथक शिल्पा शेट्टीच्या निवासस्थानी पोहोचले आणि तब्बल चार तास तीस मिनिटे तिची कसून चौकशी करण्यात आली.
सूत्रांच्या माहितीनुसार, चौकशीदरम्यान शिल्पा शेट्टीनं तिच्या जाहिरात कंपनीच्या बँक खात्यांतील व्यवहारांची सविस्तर माहिती पोलिसांना दिली. तिनं पोलिसांना काही महत्त्वाची कागदपत्रं आणि आर्थिक व्यवहारांचे पुरावे सुपूर्त केले असून, त्यांची पडताळणी सध्या सुरू आहे.
राज कुंद्रानं पोलिसांना दिलेल्या जबाबात सांगितलं की, फसवणुकीची तक्रार करणारे दीपक कोठारी यांनी एका एनबीएफसीकडून ६० कोटींचं कर्ज घेतलं होतं. हे कर्ज नंतर कोठारी यांच्या कंपनीत इक्विटीमध्ये रूपांतरित करण्यात आलं. या रकमेतील जवळपास २० कोटी रुपये सेलिब्रिटी प्रमोशन, ब्रॉडकास्ट आणि इतर मार्केटिंग कामांसाठी वापरले गेल्याचं राजनं सांगितलं.
त्याचप्रमाणे, बिपाशा बसू आणि नेहा धुपिया यांसारख्या सेलिब्रिटींना जाहिरातींसाठी फी देण्यात आल्याचंही त्यानं सांगितलं असून, त्यासंबंधित फोटो आणि पुरावेही पोलिसांना सादर करण्यात आले आहेत.
अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, चौकशी सुरू असलेल्या कंपनीत शिल्पा शेट्टी मोठी शेअरहोल्डर आहे. कंपनीत सहभाग असूनही, शिल्पानं सेलिब्रिटी फी म्हणून मोठी रक्कम घेतल्याचं पोलिसांना आढळलं आहे. ही रक्कम कंपनीच्या खर्चात दाखवण्यात आल्याने निधीचा गैरवापर झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.
गेल्या ऑगस्ट महिन्यात मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्राविरुद्ध ६०.४ कोटी रुपयांच्या फसवणुकीचा गुन्हा नोंदवला होता. ही फसवणूक आता बंद पडलेल्या बेस्ट डील टीव्ही प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीशी संबंधित असल्याचं समोर आलं आहे.
या प्रकरणात तक्रारदार दीपक कोठारी यांनी यूवाय इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेडच्या वतीने तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, २०१५ ते २०२३ दरम्यान राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टी यांनी गुंतवणुकीस प्रवृत्त करून मोठी रक्कम फसवली.
या पार्श्वभूमीवर पोलिसांनी शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा दोघांच्याही विरोधात लूकआउट नोटीस जारी केली असून, तपास पुढील टप्प्यात गेला आहे.
> पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणात आणखी काही बॉलिवूड सेलिब्रिटींची चौकशी होण्याची शक्यता आहे.