ई-कॉमर्स कंपन्यांना लाखोंची फसवणूक करणारी आंतरराज्य टोळी मुंबईत अटक 

Spread the love

ई-कॉमर्स कंपन्यांना लाखोंची फसवणूक करणारी आंतरराज्य टोळी मुंबईत अटक 

सुधाकर नाडार / मुंबई

मुंबई गुन्हे शाखा, कक्ष-८ यांनी ई-कॉमर्स कंपन्यांची लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश करत चार आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. आरोपी हे ऑनलाईन शॉपिंग ऑर्डर्समधील डिलिव्हरी बॉक्सवरील बारकोड स्टीकर अदलाबदल करून महागड्या वस्तू स्वतःकडे ठेवत आणि स्वस्त वस्तू परत पाठवून रिफंड घेण्याचा शक्कली प्रकार राबवत होते. गुप्त माहितीच्या आधारे ६ ऑक्टोबर २०२५ रोजी बोरीवली (पश्चिम) येथील चंदावरकर रोडवरील रिलायन्स डिजीटल स्टोअरसमोर गुन्हे शाखेने सापळा रचला. या कारवाईदरम्यान एक डिलिव्हरी टेम्पो आणि क्रेटा कारमधील चार संशयितांना ई-कॉमर्स पार्सलवरील बारकोड स्टीकरांची अदलाबदल करताना रंगेहात पकडण्यात आले.

प्राथमिक तपासात उघड झाले की, आरोपी महागड्या आणि स्वस्त अशा दोन स्वतंत्र ऑर्डर्स देत आणि डिलिव्हरी नोंदणीकृत पत्त्यावर न घेता दुसऱ्या ठिकाणी घेत असत. त्यानंतर महागड्या वस्तूच्या बॉक्सवरील स्टीकर स्वस्त वस्तूच्या बॉक्सवर आणि उलट चिकटवून, रिफंड प्रक्रियेत ई-कॉमर्स कंपन्यांना लाखोंनी फसवत असत. या कारवाईत पोलिसांनी इलेक्ट्रिकल व इलेक्ट्रॉनिक वस्तू, टाटा एस टेम्पो आणि क्रेटा कार असा एकूण ₹४५,०९,३३३ किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

अटक आरोपींपैकी तीन आरोपी हे हरयाणा राज्यातील रहिवासी (वय ३२ वर्षे) असून, एक आरोपी छत्तीसगडचा रहिवासी (वय २९ वर्षे) आहे. या प्रकरणी बोरीवली पोलीस ठाण्यात गुन्हा क्र. ८९/२०२५ अंतर्गत कलम ३१८(४), ३(५) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला असून, पुढील तपास गुन्हे शाखा, कक्ष-८ करीत आहे. चारही आरोपींना १३ ऑक्टोबर २०२५ पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त श्री. देवेन भारती, सह आयुक्त (गुन्हे) श्री. लखमी गौतम, अपर पोलीस आयुक्त श्री. शैलेश बलकवडे, उप आयुक्त श्री. विशाल ठाकूर, आणि सहाय्यक पोलीस आयुक्त श्री. प्रशांत राजे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रपोनि लक्ष्मीकांत साळुंखे, सपोनि रोहन बगाडे आणि त्यांच्या पथकाने केली. मुंबई गुन्हे शाखा कक्ष-८ ची ही कारवाई ई-कॉमर्स फसवणुकीविरोधात मोठा धक्का मानला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon