अल्पवयीन मुलीची विक्री करून जबरदस्तीने लग्न; नवऱ्यासह ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Spread the love

अल्पवयीन मुलीची विक्री करून जबरदस्तीने लग्न; नवऱ्यासह ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

पोलीस महानगर नेटवर्क 

पालघर – आदिवासी कातकरी समाजातील अल्पवयीन मुलींना विक्री करून जबरदस्तीने लग्न लावून देण्याचा संतापजनक प्रकार पालघर जिल्ह्यात उघडकीस आला आहे. एका १४ वर्षीय मुलीची ५० हजार रुपयांना विक्री करून तिचं लग्न जबरदस्तीने लावून दिल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणी वाडा पोलीस ठाण्यात सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, मध्यस्थी करणारा आरोपी रवि कृष्णा कोर याला पोलिसांनी अटक केली आहे.

श्रमजीवी संघटनेच्या पाठपुराव्यामुळे हा प्रकार प्रकाशात आला. वाडा तालुक्यातील इतर कातकरी वाड्यांतील अजून चार मुलींचीही अकोले परिसरात १ लाख ते सव्वा लाख रुपयांमध्ये विक्री करून लग्न लावण्यात आल्याची माहिती संघटनेने दिली आहे.

फिर्यादी अल्पवयीन पीडितेच्या तक्रारीनुसार, तिचे लग्न केवळ १४ वर्षांची असताना संगमनेर तालुक्यातील जीवन बाळासाहेब गाडे याच्यासोबत जबरदस्तीने करण्यात आले. या लग्नासाठी तिच्या कुटुंबीयांना धमक्या देण्यात आल्या तसेच ५० हजार रुपयांची रोख देवाणघेवाण करून मुलीला विकण्यात आले.

लग्नानंतर काही काळ संसार सुरळीत चालला; मात्र २०२३ मध्ये पतीने तिला जबरदस्तीने गरोदर केले. त्यानंतर नवरा, सासरे आणि सासरच्या मंडळींकडून शारीरिक व मानसिक छळ सुरु झाला. मुलगी झाल्यानंतर अत्याचाराची तीव्रता वाढली. पीडितेच्या सांगण्यानुसार, पतीने तिला धमकी देत म्हटलं, “तुझे लग्न मी ५० हजार रुपये देऊन विकत आणले आहे.”

इतकंच नव्हे, तर गर्भधारणेची नोंदणी करण्यासाठी बनावट आधारकार्ड तयार करून पीडितेची जन्मतारीख बदलण्यात आल्याचेही पोलिस तपासात समोर आले आहे.

या प्रकरणात जीवन बाळासाहेब गाडे (नवरा), बाळासाहेब गाडे (सासरे), अमोल गाडे (चुलत सासरे), तसेच दोन चुलत सासू आणि एक नातेवाईक महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मध्यस्थी करणारा आरोपी रवि कृष्णा कोर पोलिसांच्या ताब्यात असून, इतर आरोपींचा शोध सुरु आहे.

या घटनेने आदिवासी समाजात संतापाची लाट उसळली असून, अल्पवयीन मुलींच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon