स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांआधी शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्हावर उद्या अंतिम सुनावणी; सुनावणीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष

Spread the love

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांआधी शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्हावर उद्या अंतिम सुनावणी; सुनावणीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष

योगेश पांडे / वार्ताहर

मुंबई – शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्हाबाबत महत्त्वाची अपडेट समोर येत आहे. सुप्रीम कोर्टात या प्रकरणात गेल्या अनेक महिन्यांपासून सुनावणी सुरु आहे. या प्रकरणाची सुनावणी आता अंतिम टप्प्यावर आली आहे. सुप्रीम कोर्टात या प्रकरणी उद्या अंतिम सुनावणी होणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्हावर निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासाठी ही शेवटची आशा आहे. निकाल त्यांच्या बाजूने लागला तर महाराष्ट्राचं राजकारण ढवळून निघणार आहे. राज्याच्या राजकारणावर त्याचे अमूलाग्र असे बदल पडणार आहेत. यामुळे या सुनावणीकडे आणि त्याच्या निकालाकडे राज्याचं लक्ष लागलं आहे.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची सुप्रीम कोर्टात बाजू मांडणारे वकील असीम सरोदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “धनुष्यबाण हे पक्षचिन्ह मूळ शिवसेनेचं आहे. ते हिरावण्यात आलं आहे. ते चोरण्यात आलं आहे. संविधानिकदृष्ट्या जी चोरी झाली आहे ती पूर्ण महाराष्ट्राने पाहिलं आहे. निर्णय झाला नाही किंवा एखाद्या प्रकरणात निर्णय न झाल्यामुळे सत्तास्थानी असतात. याचा अर्थ ते बरोबरच आहेत, संविधानिकदृष्ट्या योग्य आहेत असं होत नाही. त्यामुळे शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्ह हे परत उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना द्यायचं, याबाबत सर्वोच्च न्यायालय निर्णय घेईल. त्यांनी ते परत दिलं तर चांगलीच गोष्ट आहे. नाहीतर त्यांनी गोठवलं तरी चालेल”, अशी प्रतिक्रिया असीम सरोदे यांनी दिली. दरम्यान, “राम आमच्याकडे आहे. त्यामुळे धनुष्यबाणही आमच्याकडेच राहील”, असा दावा मंत्री गुलाबराव पाटील यांनी केला आहे.

शिवसेना पक्षफुटीला आता जवळपास तीन वर्षे झाले आहेत. या प्रकरणी निवडणूक आयोग, सुप्रीम कोर्ट आणि विधानसभा अध्यक्षांच्या समोर सुनावणी पार पडली आहे. निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला पक्षाचं नाव आणि चिन्ह बहाल केलं. त्यावर उद्धव ठाकरे यांनी सुप्रीम कोर्टात चॅलेंज दिलं. त्यावर सुनावणी सुरु आहे. या सुनावणीदरम्यान आमदारांच्या अपात्रतेबाबत निर्णय घेण्याचा अधिकार सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्षांना दिला. त्यानुसार विधानसभा अध्यक्षांनी सुनावणी घेत दोन्ही पक्षांची बाजू ऐकून घेत निकाल दिला. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दोन्ही पक्षांच्या आमदारांना पात्र ठरवलं. या निर्णयाला देखील सुप्रीम कोर्टात आव्हान देण्यात आलं आहे. आता शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्हाबाबतची सुनावणी अंतिम टप्प्यावर आली आहे.

या प्रकरणाची अंतिम सुनावणी उद्या सुप्रीम कोर्टात होणार आहे. यावेळी दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर सुप्रीम कोर्ट काय निर्णय घेतं? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. सुप्रीम कोर्टाने या प्रकरणी तातडीने निकाल दिला तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांआधी मोठा ट्विस्ट निर्माण होणार आहे. पुढचं राजकारण या निर्णयामुळे बदलू देखील शकणार आहे. त्यामुळे या सुनावणीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon