चांदीवर सोन्याचे पाणी, बनावट हॉलमार्क अन्… कल्याणमध्ये ‘बंटी-बबली’चा नवा कारनामा!
पोलीस महानगर नेटवर्क
कल्याण – शहरात चक्क चांदीच्या दागिन्यांवर सोन्याचा मुलामा चढवून आणि त्यावर बनावट BIS हॉलमार्क लावून ज्वेलर्सना लाखोंचा गंडा घालणाऱ्या भामट्या दाम्पत्याचा पर्दाफाश झाला आहे. महात्मा फुले पोलिसांनी तिसऱ्यांदा फसवणुकीचा प्रयत्न करत असताना या ‘बंटी-बबली’ला सापळा रचून जेरबंद केले.
अश्विनी सागर शेवाळे (३२) आणि मयूर विनोद पाटोळे (३४) अशी या आरोपी दाम्पत्याची नावे आहेत. गेल्या तीन दिवसांत या जोडीने कल्याण पश्चिमेतील मुख्य बाजारपेठ परिसरातील दोन ज्वेलर्सना बनावट सोन्याचे दागिने गहाण ठेवून लाखोंचा चुना लावला होता.
या दाम्पत्याची पद्धत अत्यंत चलाख होती. ते प्रथम चांदीच्या दागिन्यांवर सोन्याचे पाणी चढवून ते खरे सोनं असल्याचा भास निर्माण करत असत. त्यानंतर, आजारपणाचे किंवा पैशांची निकड असल्याचे कारण सांगून ते दागिने गहाण ठेवत. त्या दागिन्यांवर BIS हॉलमार्कचा शिक्का असल्याने ज्वेलर्सचा संशय दूर व्हायचा आणि हे ‘बंटी-बबली’ आपला डाव साधायचे.
तथापि, तिसऱ्या वेळी एका ज्वेलर्सला काहीतरी संशयास्पद वाटल्याने त्याने तत्काळ पोलिसांना कळवले. महात्मा फुले पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे शोध घेत या दाम्पत्याला ठाणे परिसरातून अटक केली.
पोलिस चौकशीत या दागिन्यांवर बनावट हॉलमार्कचा शिक्का पुण्यातील शरण शिलवंत या व्यक्तीकडून मारून घेतल्याचे उघड झाले. पोलिसांनी तत्काळ पुण्यात सापळा रचून त्यालाही बेड्या ठोकल्या.
या तिघांनी मिळून आणखी किती ज्वेलर्सना फसवले आहे, तसेच या फसवणुकीच्या रॅकेटमध्ये इतरांचा सहभाग आहे का, याचा तपास महात्मा फुले पोलीस करत आहेत.
> पोलिसांकडून आवाहन:
सोन्याचे दागिने खरेदी किंवा गहाण ठेवताना BIS हॉलमार्कची खात्री करूनच व्यवहार करावा, असे आवाहन पोलिसांनी नागरिकांना केले आहे.