दिवाळीतील ‘आनंद’ हरपला! आर्थिक चणचणीमुळे ‘आनंदाचा शिधा’ योजना थंडबस्त्यात
पोलीस महानगर नेटवर्क
मुंबई : राज्यातील गोरगरिबांना सणासुदीचे दिवस आनंदाने साजरे करता यावेत, यासाठी सुरू करण्यात आलेली ‘आनंदाचा शिधा’ योजना यंदा दिवाळीतही थंडबस्त्यात गेली आहे. आर्थिक चणचणीमुळे सरकारकडून या योजनेसाठी निधीच मंजूर करण्यात आलेला नाही, त्यामुळे नागरिकांना पुन्हा एकदा निराश व्हावे लागत आहे.
तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने २०२२ मध्ये ‘आनंदाचा शिधा’ योजना सुरू केली होती. गणेशोत्सव, दिवाळी, गुढीपाडवा, शिवजयंती आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीसारख्या सणांच्या काळात सर्वसामान्यांना १०० रुपयांत चार जिन्नस एक किलो पामतेल, रवा, चणाडाळ आणि साखर देण्यात येत होते. या योजनेचा लाभ तब्बल १ कोटी ७२ लाख शिधापत्रिकाधारकांनी घेतला होता. त्या वर्षी सरकारने या उपक्रमावर सुमारे ₹२४०० कोटी रुपये खर्च केले होते.
मात्र, विधानसभा निवडणुकांनंतर सत्तेवर आलेल्या महायुती सरकारकडून या योजनेसाठी कोणताही निधी मंजूर केलेला नाही. अन्न व नागरी पुरवठा विभागाला अद्याप मुख्यमंत्री कार्यालयाकडून निर्देश मिळाले नसल्याने निधीचा प्रस्तावही तयार करण्यात आलेला नाही, अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. साधारणपणे प्रत्येक सणापूर्वी दीड महिना आधी प्रस्ताव सादर करून निधी वितरित करण्याची प्रक्रिया असते. मात्र यंदा दिवाळी दोन आठवड्यांवर आली असतानाही कोणतीही हालचाल झालेली नाही.
राज्यातील अनेक भागात यंदा अतिवृष्टीमुळे तब्बल ६० लाख हेक्टरवरील पिके वाया गेली आहेत. शेतकरी संकटात असताना ‘आनंदाचा शिधा’ योजनेंतर्गत दिलासा मिळेल, अशी अपेक्षा होती. परंतु आर्थिक अडचणींचा दाखला देत ही योजना बंद होण्याच्या मार्गावर असल्याची चिन्हे दिसत आहेत.
लोकप्रिय योजनांमध्ये ‘लाडकी बहीण’, ‘शेतकऱ्यांना मोफत वीज’ अशा काही योजना सुरु असल्या, तरी ‘आनंदाचा शिधा’, ‘तीर्थाटन योजना’सारख्या उपक्रमांना निधीअभावी कात्री लागल्याचे स्पष्ट झाले आहे.
सणासुदीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या वाढत्या अपेक्षा आणि सरकारच्या मर्यादित आर्थिक क्षमतेमुळे, या वर्षी दिवाळीत राज्यातील गोरगरिबांचा ‘आनंद’ मात्र हरपला आहे.