एकनाथ शिंदेंचे ओएसडी मंगेश चिवटेंच्या भावाला मारहाण; वैयक्तिक आर्थिक व्यवहारातून मारहाण झाल्याचा शिवसेने नेते दिग्विजय बागल यांचा दावा
योगेश पांडे / वार्ताहर
करमाळा – राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे सोलापूरचे जिल्हाप्रमुख आणि शिंदेंचे ओएसडी मंगेश चिवटे यांचे बंधू महेश चिवटे यांच्यावर झालेला प्राणघातक हल्ला झाला होता. त्या हल्ल्याचा आरोप चिवटेंनी शिवसेनेचे नेते दिग्विजय बागल यांच्यावरती केला होता, त्यानंतर बागल यांनी याबाबत खुलासा केला आहे. हा हल्ला त्यांच्या वैयक्तिक आर्थिक व्यवहारातून झालेला होता. बागल परिवाराचा याच्याशी कोणताही संबंध नाही असा खुलासा करमाळ्यातील शिवसेनेचे नेते दिग्विजय बागल यांनी केला आहे.
करमाळ्याचे माजी आमदार कैलासवासी दिगंबर बागल आणि दुसऱ्या माजी आमदार श्रीमती शामलताई बागल यांचे दिग्विजय बागल हे चिरंजीव असून त्यांनी गटाकडून नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत करमाळ्यातून निवडणूक लढवली होती. गेल्या तीन दशकापासून करमाळा तालुक्यात बागल गट एक प्रमुख ताकद असून जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांच्याशी झालेल्या वादाने करमाळा तालुक्याचे राजकारण पुन्हा एकदा ढवळून निघाले आहे. बागल चिवटे वादामुळे शिंदे शिवसेनेतील वादही चव्हाट्यावर आले आहेत.
महेश चिवटे यांचा माझ्याबाबत आकस का आहे हे मला अजून समजले नसून यापूर्वीही मी दमबाजी केली म्हणून खोटी तक्रार पोलिसात दिल्याचे दिग्विजय बागल यांनी सांगितले आहे. ही घटना घडली तेव्हा मी पूरग्रस्त भागाच्या दौऱ्यावर होतो तर भगिनी रश्मी बागल या पुण्यात होत्या. मंगेश चिवटे यांच्या फोन मुळेच मला याबाबत माहिती समजली. पण माझा संबंध नसताना विनाकारण माझ्यावर असे आरोप का केले जात आहेत हाच प्रश्न मला महेश चिवटे यांना विचारायचा आहे.
चिवटे यांना मारहाण करणारा मनोज लांडगे हा माझा कार्यकर्ता आहे, मात्र करमाळा तालुक्यात असे हजारो कार्यकर्ते आहेत. त्यांच्या वैयक्तिक वादास जर मला जबाबदार ठरले तर मी आयुष्यभर जेलमधून बाहेर येणार नाही, मला तर मोका लावावा लागेल अशी टीका बागल यांनी केली आहे. चिवटे यांनी करमाळा पोलिसात तक्रार दिली आहे. आता पोलीस तपास करतील माझे सीडीआर तपासा किंवा कोणतीही चौकशी करा माझा कायद्यावर पूर्ण विश्वास आहे. मी छत्रपतींचा मावळा असून मी केले तर उघड केले म्हणेन मात्र काही केलेच नसताना हे विनाकारण आरोप का असा सवालही बागल यांनी केला आहे.