किरकोळ वादातून मित्रांनीच केली मित्राची हत्या; शांतीनगर पोलिसांनी पाच जणांना ठोकल्या बेड्या
योगेश पांडे / वार्ताहर
भिवंडी – भिवंडी शहरातील शांतीनगर परिसरात घडलेल्या धक्कादायक घटनेत, किरकोळ वादातून मित्रांनीच मित्राची हत्या केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. जिशान अन्सारी (२५) असे मृत तरुणाचे नाव असून, या प्रकरणी पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जिशान अन्सारी आणि त्याचे परिचित हसन मेहबुब शेख (२२), मकबुल मेहबुब शेख (३०) आणि हुसेन मेहबुब शेख (२८) हे तिघे भाऊ एकाच गोदामात हमालीचे काम करीत होते. काही दिवसांपूर्वी कामावरून त्यांच्यात किरकोळ कारणावरून वाद झाला होता. हा वाद मिटल्यासारखा वाटत असला तरी हसन आणि त्याच्या भावांनी मनात राग धरला होता.
शनिवारी सायंकाळच्या सुमारास हसन, मकबुल, हुसेन, सुलताना मेहबुब शेख आणि आसमा वाजिद हे पाच जण जिशानच्या घरी गेले. त्यांनी घरात शिरून जिशानच्या कुटुंबीयांना शिवीगाळ करत हातापायीचा मारहाण केली. त्याचवेळी जिशान दुचाकीवरून घरी आला. तो दुचाकीवरून उतरत असतानाच हसनने त्याला जोरदार लाथ मारली. ती लाथ थेट वर्मी बसल्याने जिशान जमिनीवर कोसळला आणि गंभीर दुखापतीमुळे त्याचा जागीच मृत्यू झाला.
या घटनेची माहिती मिळताच शांतीनगर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात हलवला. प्रारंभी वादातून झालेल्या मारहाणीत मृत्यू झाल्याचे समोर आले असले तरी प्राथमिक तपासात नियोजित हल्ल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी हसन मेहबुब शेख, मकबुल मेहबुब शेख, हुसेन मेहबुब शेख, सुलताना मेहबुब शेख आणि आसमा वाजिद या पाच जणांविरुद्ध भादंवि कलम ३०२ अंतर्गत खुनाचा गुन्हा दाखल करून त्यांना ताब्यात घेतले आहे.या घटनेमुळे शांतीनगर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, पोलिसांनी परिसरात अतिरिक्त बंदोबस्त तैनात केला आहे. किरकोळ वादातून एका तरुणाचा जीव जाण्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.