नाशिकमध्ये खुनाचे सत्र सुरूच; गुन्हेगारी वाढीमुळे नागरिकांत भीतीचे वातावरण
पोलीस महानगर नेटवर्क
नाशिक : शहरात खूनाच्या घटनांनी उग्र रूप धारण केले असून, नाशिकरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत गोरेवाडी परिसरात २४ वर्षीय युवकाचा धारदार शस्त्रांनी खून करण्यात आला. मृताचे नाव कृष्णा दीपक ठाकरे असे असून, गुरुवारी (दि. २) रात्री साडेअकरा वाजताच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली.
प्राथमिक माहितीनुसार, तिघा हल्लेखोरांनी कुरापत काढत कृष्णावर सपासप वार केले. गंभीर जखमी अवस्थेत त्याला बिटको रुग्णालयात नेण्यात आले, मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
या प्रकरणी नाशिकरोड पोलिसांत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपी फरार आहेत. त्यांचा शोध घेण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज तपासून पथके कार्यरत आहेत.
दरम्यान, विजयादशमीच्या दिवशीच तिघा टवाळखोरांनी दुचाकीवरून येत परिसरातील चारचाकी गाड्यांच्या काचा फोडून दहशत माजवली. या घटनेची नोंद उपनगर पोलिसांत झाली आहे.
नाशिकमध्ये गेल्या नऊ महिन्यांत तब्बल ४३ खून झाल्याची नोंद असून, वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शहरातील कायदा-सुव्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी पोलिस कोणती ठोस पावले उचलतात, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.