पोलिसांच्या तावडीतून पळालेल्या गुन्हेगाराकडून अल्पवयीन चिमुरडीवर अत्याचार करत हत्या; भोईवाडा पोलीसांनी नराधामाला ठोकल्या बेड्या
योगेश पांडे / वार्ताहर
भिवंडी – बुधवारी भिवंडी शहरालगतच्या काटई ग्रामपंचायत हद्दीतील मांगत पाडा येथे धक्कादायक घटना घडली आहे. येथे एक सहा वर्षीय अल्पवयीन चिमुरडी दुपारी तीन वाजता शौचास चाळीच्या शौचालयात गेली होती. मात्र तिच्यावर अत्याचार करत तिचा खून झाल्याचे समोर आले आहे. हे कृत्य पोलिसांच्या तावडीतून पळालेल्या एका आरोपीने केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
भिवंडी शहरालगतच्या काटई ग्रामपंचायत हद्दीतील मांगत पाडा येथील सहा वर्षीय अल्पवयीन चिमुरडी दुपारी तीन वाजता शौचास चाळीच्या शौचालयात गेली होती. मात्र बराच वेळ झाला तरी ती माघारी न आल्याने कुटुंबियांनी तिचा शोध घेतला, मात्र ती सापडली नाही. त्यामुळे निजामपूर पोलिसांकडे तक्रार देण्यात आली, त्यानंतर तिचा शोध सुरु केला. यावेळी नजिकच्या चाळीतील एका बंद खोलीच्या झरोक्यातून आता पाहण्याचा प्रयत्न केला असता चिमुरडीने शौचालयास जाताना सोबत नेलेली बादली दिसली. त्यावेळी नागरिकांनी खोलीचे कुलूप तोडून खोलीत प्रवेश केला. त्यावेळी एका कोपऱ्यात प्लास्टिक गोणीत चिमुरडीचा मृतदेह आढळला. तिच्या तोंडात कुरकुरेही भरलेले आढळले.
या घटनेनंतर पोलीसांनी आरोपीचा शोध सुरु केला असता हे कृत्य सलामत अन्सारी या आरोपीने केल्याचे समोर आले. याच गुन्हेगाराने १३सप्टेंबर २०२३ मध्ये फेणेगाव येथे चाळीतील सहा वर्षीय चिमुरडीला खाऊचे आमिष दाखवत खोलीत बोलावून तिच्यावर अत्याचार करून तिची हत्या करत मृतदेह बादली मध्ये कोंबून पसार झाला होता. या घटनेनंतर पोलिसांनी आरोपीला बिहारमधील मधुबनी जिल्ह्यातील नवादा येथून अटक केली होती. त्यानंतर त्याची रवानगी कारागृहात केली होती.
या प्रकरणाच्या न्यायालयीन सुनावणीसाठी ४ ऑगस्ट २०२५ रोजी भिवंडी न्यायालयात त्याला हजर करण्यासाठी पोलिसांना त्याला आणले होते. त्यावेळी पोलिसांची नजर चुकवून आरोपी सलामत हा पसार झाला होता. त्यामुळे पोलिस प्रशासनावर अनेकांकडून टीका होत असताना बंदोबस्ताला असणाऱ्या पाच पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले. त्यानंतर पोलिस आरोपीचा शोध घेत असताना आरोपी भिवंडी परिसरातच ओळख लपवून वावरत होता.
तो काटई ग्रामपंचायत हद्दीतील मांगत पाडा येथील एका खोलीत भाड्याने राहण्यासाठी एक आठवडे पूर्वी राहण्यास आला होता. त्यानंतर त्याने १ ऑक्टोबर रोजी हे दुष्कर्म केले आहे. घटनेचे गांभीर्य ओळखून सर्व पोलीस आरोपीचा शोध घेण्यासाठी फिरत असताना भोईवाडा पोलिस ठाणे हद्दीतील दिवाण शहा तलाव येथे आरोपी फिरत असताना पोलीस पथकाने त्याच्या मुसक्या आवळल्या.