अंबरनाथ रेल्वे स्टेशन परिसरातील स्कायवॉकवर चेन स्नॅचिंग करणाऱ्या आरोपीला अटक

Spread the love

अंबरनाथ रेल्वे स्टेशन परिसरातील स्कायवॉकवर चेन स्नॅचिंग करणाऱ्या आरोपीला अटक

योगेश पांडे / वार्ताहर

अंबरनाथ – अंबरनाथ रेल्वे स्टेशन परिसरातील स्कायवॉकवर चेन स्नॅचिंग करणाऱ्या आरोपीला पकडताना जीआरपी आणि आर पी एफ जवानांनी मोठा थरार अनुभवला. मुकेश कोळी नावाच्या या चोरट्याला पोलिसांनी दुसऱ्याच दिवशी सापळा रचून पकडले, तेव्हा त्याने लोकल ट्रेन येत असतानाच थेट रेल्वे ट्रॅकवर उडी मारली. मात्र, पोलीस कर्मचाऱ्यांनीही धोका पत्करून पाठलाग करत त्याला ताब्यात घेतले. हा ‘हाय-व्होल्टेज’ ड्रामा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

या प्रकरणात मिळालेल्या माहितीनुसार कृष्णा कहार नावाचा अंबरनाथमधील १२ वीचा विद्यार्थी अंबरनाथहून विठ्ठलवाडीला शिक्षणासाठी रेल्वेने जातो. ३० सप्टेंबर रोजी कृष्णा कहार हा विद्यार्थी अंबरनाथ स्टेशन परिसरातील स्कायवॉकवर उभा असताना, अचानक एका व्यक्तीने त्याच्या गळ्यातील सोन्याची चेन हिसकावली आणि पळ काढला. या घटनेनंतर कृष्णाने तात्काळ कल्याण रेल्वे पोलीस ठाण्यात चोरीची तक्रार दाखल केली.

चोरीच्या घटनेनंतर, कल्याण रेल्वे पोलीस आणि रेल्वे सुरक्षा बल यांनी या गुन्ह्याची गंभीर दखल घेतली. चोरटा पुन्हा त्याच परिसरात चोरी करण्यासाठी येण्याची शक्यता लक्षात घेऊन, पोलिसांनी घटना घडलेल्या ठिकाणी म्हणजेच स्कायवॉक परिसरात सापळा रचला. पोलिसांचा हा अंदाज खरा ठरला. दुसऱ्याच दिवशी, चोरी करणारा आरोपी पुन्हा त्याच स्कायवॉकवर आला असता, जीआरपी आणि आर पी एफ च्या जाळ्यात अडकला.

पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचे नाव मुकेश कोळी असे आहे. तो एका मेसमध्ये काम करतो. पोलिसांनी केलेल्या चौकशीदरम्यान, त्याला पैशाची गरज असल्याने त्याने चोरी केल्याची कबुली दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon