दिवाळीचा प्रवास महागला : महामंडळाकडून एसटी भाडेवाढीचा निर्णय 

Spread the love

दिवाळीचा प्रवास महागला : महामंडळाकडून एसटी भाडेवाढीचा निर्णय 

योगेश पांडे / वार्ताहर 

मुंबई – राज्य परिवहन महामंडळाच्या (एमएसआरटीसी) प्रवाशांना दिवाळीपूर्वीच भाडेवाढीचा धक्का बसला आहे. महामंडळाने १० टक्के भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतला असून ही वाढ १५ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर या कालावधीत लागू राहणार आहे.

महामंडळाच्या निर्णयानुसार, वातानुकूलित शिवनेरी आणि शिवाई बसेस वगळता सर्वच बससेवांमध्ये ही भाडेवाढ लागू होणार आहे. त्यामुळे गावोगावी धावणाऱ्या लालपरीपासून ते रातराणीसारख्या लांब पल्ल्याच्या गाड्यांनी प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या खिशाला झळ बसणार आहे. उदाहरणार्थ, जिथे आधी १०० रुपयांचे भाडे होते, तिथे आता प्रवाशांना ११० रुपये मोजावे लागतील.

दिवाळीच्या काळात लाखो प्रवासी एसटीचा वापर करतात. खासगी चारचाकी वाहने वाढली असली तरी सुरक्षिततेच्या दृष्टीने एसटी अजूनही मोठ्या प्रमाणावर पसंतीस उतरते. मात्र, नव्या दरवाढीमुळे सर्वसामान्यांच्या प्रवासखर्चात वाढ होणार आहे.

गतवर्षी जानेवारीतच एसटीच्या भाड्यात १४.९५ टक्क्यांची वाढ करण्यात आली होती. त्यानंतर आता पुन्हा दिवाळीपूर्वी प्रवाशांना भाडेवाढीचा सामना करावा लागणार आहे. ग्रामीण भागातील शेतकरी आणि सर्वसामान्य प्रवाशांसाठी ही वाढ आणखी मोठा ताण देणारी ठरणार असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon