पनवेल बालसुधारगृहातून पलायन केलेल्या पाच मुलींपैकी तिघांना शोधण्यात यश; दोन मुलींचा शोध सुरुच
योगेश पांडे / वार्ताहर
पनवेल – पनवेलमधील बालसुधारगृहातून पाच मुली पळून गेल्या असल्याची धक्कादायक घटना रविवारी घडली होती. या संदर्भात पनवेल शहर पोलिसांनी १२ ते १७ वयोगटातील या मुलींचे अपहरण केल्याची तक्रार नोंदवली. गुन्हा दाखल झाल्यानंतर,पनवेल शहर पोलिसांनी रेल्वे पोलिस आणि मुलींच्या नातेवाईकांच्या मदतीने काही तासांतच तीन मुलींना सुरक्षितपणे शोधून काढले. यावेळी मुलींनी धक्कादायक कारण सांगितले की त्यांना बालसुधारगृहात राहायचे नव्हते, म्हणूनच त्या स्वतः पळून गेल्या. तर अन्य दोन मुलींचा शोध सध्या सुरू आहे.
यावेळी पनवेल पोलिसांच्या इतर तपास यंत्रणांशी समन्वयामुळे शोध मोहीम यशस्वी झाली. पाचपैकी तीन मुली सापडल्या. त्यापैकी एक उरणमधील चिरनेर येथील तिच्या गावात सापडली. दुसरी मुलगी मुंबईतील वांद्रे येथील रेल्वे पोलिसांना सापडली. तिच्यासोबत कोणीही नसल्याने तिला डोंगरी येथील बालसुधारगृहात ठेवण्यात आले आहे. तिसरी मुलगी सातारा जिल्ह्यातील तिच्या मूळ गावी पोहोचल्याची माहितीही पोलिसांना मिळाली. सातारा पोलिसांनी या मुलीला जवळच्या बालसुधारगृहात ठेवण्याची कारवाई सुरू केल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणाच्या संदर्भात पोलिस इतर दोन मुलींचा शोध घेत आहेत.
बालसुधारगृहातून पळून गेलेल्या मुलींनी सांगितले की, पनवेलमधील मुलींच्या अनाथाश्रमाची एक मजली इमारत आहे. मुलींना त्यांच्या मनाप्रमाणे अनाथाश्रमात राहण्याची परवानगी नव्हती, म्हणून त्यांनी पळून जाण्याचा कट रचला. त्यांनी सभागृहाच्या खिडकीचे लोखंडी ग्रिल कापले, त्यानंतर त्या खिडकीबाहेर असलेल्या पाण्याच्या टाकीवर चढल्या. थोडे अंतर चालल्यानंतर, त्या शौचालयाच्या पाईपमधून जमिनीवरून खाली घसरत उतरल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.