पोलीस आणि प्रशासन सहकार्य करत नसल्याचे आरोप करत मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावरच वृद्धाचा जीव संपवण्याचा प्रयत्न
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई – मंत्रालय परिसरातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावर वृद्धाने आत्मदहनाचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे. हा व्यक्ती नवी मुंबईचा असल्याची माहिती समोर आली आहे. पोलीस आणि प्रशासन सहकार्य करत नसल्याचे म्हणत या व्यक्तीने आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला, मात्र मंत्रालयातील सुरक्षा रक्षक आणि पोलीस यांनी वेळीच मध्यस्थी केल्याने मोठा अनर्थ टळला आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, या वृद्ध व्यक्तीने नवी मुंबई महापालिका आणि पोलीसांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. पालीका आणि पोलिस मदत करत नाहीत असा आरोप करत या व्यक्तीने आत्मदहनाचा प्रयत्न केला. या व्यक्तीने सोबत रॉकेल आणले होते, हा व्यक्ती अंगावर रॉकेल ओतून घेत असताना पोलीसांना त्याला थांबवले आणि हे कृत्य करण्यापासून रोखले. आता पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असल्याची माहिती समोर आली आहे.
आत्मदहनाचा प्रयत्न करणारा हा व्यक्ती कोण होता? त्याच्या अडचणी नेमक्या काय होत्या? त्याला नवी मुंबई पालिका प्रशासन आणि पोलीसांनी नेमका काय त्रास दिला याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. तसेच या व्यक्तीच्या मागण्या काय होत्या हेही समजू शकलेले नाही. सध्या हा व्यक्ती पोलिसांच्या ताब्यात आहे. त्याची चौकशी सुरु असल्याची माहिती समोर आली आहे. चौकशीनंतर आत्मदहनाचे खरे कारण समोर येणार आहे. सध्या या प्रकरणाबाबत कोणतीही माहिती मिळू शकलेली नाही.