कुलाब्यातील कलादालनात हिंदू देवतांची आक्षेपार्ह चित्रे; आयोजक, कलाकारांविरोधात गुन्हा
पोलीस महानगर नेटवर्क
मुंबई – कुलाबा येथील मस्कारा कलादालन मध्ये प्रदर्शनात हिंदू देवी-देवतांचे आक्षेपार्ह चित्रे मांडल्याने शहरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणी कलाकार टी. वेंकण्णा आणि कलादालनाचे मालक अभय मस्कारा यांच्याविरुद्ध धार्मिक भावना भडकविल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कुलाब्यातील तिसरा पास्ता लेन येथे ‘गॅलरी मस्कारा’ या कलादालनात ११ सप्टेंबरपासून चित्रप्रदर्शन सुरु असून, १ नोव्हेंबरपर्यंत ते चालणार आहे. प्रदर्शनात देवी महाकाली, भगवान शंकर यांचे आक्षेपार्ह अवस्थेतील चित्र, तसेच नग्नावस्थेतील पुरुष व स्त्रियांच्या लैंगिक छायाचित्रांचा समावेश होता. मात्र, अल्पवयीनांसाठी (१८ वर्षांखालील) प्रवेश निषिद्ध असल्याचा कोणताही फलक लावण्यात आलेला नव्हता.
मशिद बंदर येथील वकील ॲड. विशाल नखवा (४५) यांनी शुक्रवारी दुपारी एका व्हॉट्स ॲप ग्रुपवरून या प्रदर्शनाची माहिती मिळवली आणि कलादालनाला भेट दिली. नखवा यांनी आपले सहकारी वकील मदन श्रीकृष्ण रेड्डी यांना देखील घटनास्थळी बोलावले. कलादालन आतून बंद करण्यात आले होते, आणि त्यांनी पोलिसांना घटनास्थळी बोलावले.
यानंतर नखवा यांनी कुलाबा पोलीस ठाण्यात जाऊन कलादालनाचे मालक अभय मस्कारा आणि कलाकार टी. वेंकण्णा यांच्याविरुद्ध औपचारिक तक्रार दाखल केली. या तक्रारीनुसार, भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांनुसार दोघांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
स्थानिक नागरिक आणि धर्मीय संघटनांनी या प्रकरणावर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी या प्रकरणी सखोल चौकशी सुरू केली असून, पुढील तपासाद्वारे आवश्यक ती कार्यवाही केली जाईल.