मोबाइल टॉवरविरोधात वडाला (पूर्व) येथे रेल रोको आंदोलन
सुधाकर नाडार / मुंबई
मुंबई – वडाला (पूर्व) येथील चोपडापट्टी परिसरात बेकायदेशीरपणे उभारण्यात आलेल्या मोबाइल टॉवरविरोधात स्थानिकांनी आज सकाळी ११.३० वाजता बीपीटी रेल्वे लाईनवर रेल रोको आंदोलन छेडले.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, या टॉवरच्या रेडिएशनमुळे परिसरातील तीन जणांचा मृत्यू झाला असून अनेक नागरिक गंभीर आजारांनी त्रस्त आहेत. रहिवाशांनी वारंवार रेल्वे, बॉम्बे पोर्ट ट्रस्ट, मुंबई महापालिका आणि पोलिसांकडे तक्रारी केल्या, मात्र कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही.
आंदोलनामुळे काही काळासाठी हार्बर लाईनवरील वडाला ते जीटीबी नगर दरम्यानची सेवा विस्कळीत झाली. आंदोलक गुलमोहर सिद्दीकी यांनी इशारा दिला –
“आजचे आंदोलन हे फक्त एक ड्रिल होते. जर मोबाइल टॉवर तातडीने काढून टाकले नाहीत, तर आम्ही चौथी रेल्वे लाईन पूर्णपणे बंद करू.”
घटनेची माहिती मिळताच वडाला पोलिस व रेल्वे पोलिस घटनास्थळी दाखल झाले. वडाला पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुदर्शन हनवडाजकर यांनी आंदोलकांना आश्वासन दिले की, बीपीटी अधिकारी आणि मोबाइल टॉवर कंपनीचे प्रतिनिधी यांना बोलावण्यात आले असून, संबंधित टॉवर आजच हटविण्यात येईल.
या आश्वासनानंतर आंदोलकांनी “मुंबई पोलीस जिंदाबाद”च्या घोषणा दिल्या आणि शांततेत पार पडले.