“जुहूतील बोरा-बोरा रेस्टॉरंट बिनपरवाना सुरु; आरटीआयतून धक्कादायक उघड”
मुंबई – जुहूच्या पॉश भागात बोरा-बोरा नावाचे हायप्रोफाईल रेस्टॉरंट व क्लब परवानगीशिवाय सुरु असल्याचा धक्कादायक खुलासा झाला आहे. विशेष म्हणजे, संध्याकाळच्या वेळी अनेक चित्रपट कलाकार येथे डिनरसाठी येत असतात.
ही माहिती आरटीआय कार्यकर्ते समीर शेख यांनी बीएमसीकडे माहिती अधिकार कायद्यांतर्गत मागितल्यानंतर उघड झाली आहे. बीएमसीने दिलेल्या उत्तरात स्पष्ट झाले की, बोरा-बोरा रेस्टॉरंटकडे कोणताही ट्रेड लायसन्स नाही.
मुंबईत हॉटेल सुरू करण्यासाठी महापालिकेकडून मिळणारा ट्रेड लायसन्स हा कायदेशीररीत्या अनिवार्य आहे. या परवानगीमुळे हॉटेल स्थानिक सुरक्षा व आरोग्य नियमांचे पालन करत असल्याची खात्री केली जाते. मात्र, बोरा-बोरा रेस्टॉरंटकडे ट्रेड लायसन्स नसल्याने त्यांचे कामकाज बेकायदेशीर ठरते.
इतकेच नव्हे, महाराष्ट्र शासनाच्या शॉप अॅक्टनुसार तसेच रेस्टॉरंटच्या साइनबोर्डवरही कोणतेही परवाने घेतलेले नाहीत. नेमके किती वर्षांपासून हे रेस्टॉरंट अशा पद्धतीने सुरु आहे, हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
समीर शेख यांनी याबाबत सांगितले की, “काही दिवसांपूर्वी यासंबंधी माहिती मिळाल्यानंतर मी बीएमसीकडे अर्ज केला. त्यानंतर महापालिकेने दिलेल्या उत्तरातून हा संपूर्ण प्रकार उघड झाला.”