बांद्रा तलावात ड्रग्ज माफियांचा अड्डा; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण, पोलिस कारवाईची मागणी
सुधाकर नाडार / मुंबई
मुंबई – बांद्रा पश्चिमेतील ऐतिहासिक व रमणीय बांद्रा तलाव (स्वामी विवेकानंद सरोवर) परिसरात सध्या ड्रग्ज माफियांचा धुमाकूळ सुरू असल्याने स्थानिक नागरिकांमध्ये मोठी भीती निर्माण झाली आहे. कुटुंबांसाठी, लहान मुलांसाठी आणि सकाळ-संध्याकाळ फिरण्यासाठी ओळखला जाणारा हा तलाव परिसर आता नशेखोर व अंमली पदार्थ विक्रेत्यांचे अड्डे बनला असून, त्यामुळे नागरिकांना सुरक्षिततेची शाश्वती राहिलेली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, वसीम नावाचा सरगना आपल्या साथीदारांसह – यासीन शेख, त्याची पत्नी फरीदा आणि शबनम – यांच्या मदतीने गांजा आणि इतर अंमली पदार्थांची खुलेआम विक्री करत आहे.
🔹 अंमली पदार्थांच्या व्यवहाराचा प्रकार असा –
वसीम मोठ्या प्रमाणावर ड्रग्ज आणतो.
त्यानंतर तो माल यासीन शेखकडे सोपवतो.
यासीन ड्रग्ज छोटे पाकिटांमध्ये विभागून पत्नी फरीदा व साथीदार शबनमकडे देतो.
फरीदा आणि शबनम तलाव परिसरात आपल्या लोकांच्या माध्यमातून व्यसनाधीन युवकांना व विद्यार्थ्यांना हे ड्रग्ज विकतात.
स्थानिकांचा आरोप आहे की, शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थी तसेच तरुण मुलीही या टोळीच्या जाळ्यात अडकत आहेत. एवढेच नाही तर, संबंधित आरोपींवर आधीच एनडीपीएस कायद्याअंतर्गत दोन गुन्हे बांद्रा पोलिस ठाण्यात नोंद आहेत, तरीदेखील त्यांच्या हालचालींवर नियंत्रण आलेले नाही. नागरिकांचे म्हणणे आहे की, “बांद्रा तलाव हे पूर्वीचे एक सुंदर पिकनिक स्पॉट होते, पण आज ड्रग्ज माफियांमुळे आम्हाला आपल्या मुलांना तिथे घेऊन जाण्याची भीती वाटते. पोलिसांनी तात्काळ कारवाई करून या टोळीचा बंदोबस्त करावा.”
विशेष म्हणजे, स्वामी विवेकानंद यांच्या नावाशी जोडलेला तलाव ड्रग्जच्या अड्ड्यात बदलणे हे समाजासाठी अत्यंत लाजिरवाणे असल्याचे स्थानिकांनी नमूद केले आहे. नागरिकांनी याबाबत तातडीने पोलिस कारवाई होऊन परिसर पुन्हा एकदा कुटुंबांसाठी सुरक्षित व्हावा, अशी जोरदार मागणी केली आहे.