मुंबई–अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक कोंडीत अडकून १६ महिन्यांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
योगेश पांडे / वार्ताहर
वसई – नायगावच्या चिंचोटी येथील गॅलेक्सी रुग्णालयात या १६ महिन्यांच्या चिमुकल्यावर उपचार सुरू होते. मात्र, डॉक्टरांनी पुढील उपचारासाठी त्याला मुंबईच्या रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला दिला. त्यानंतर चिमुकल्याच्या कुटुंबीयांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार चिमुकल्याला रुग्णवाहिकेतून मुंबई येथे रुग्णालयात दाखल करण्याचा निर्णय घेतला. कुटुंबीय चिमुकल्याला रुग्णवाहिकेतून मुंबईच्या दिशेने घेऊन जात असताना मुंबई–अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक कोंडी रुग्णवाहिका अडकून पडली. तब्बल ५ तास चिमुकला असलेला रुग्णवाहिका वाहतूक कोंडीत अडकली. चिमुकल्याची हालचाल बंद झाल्यामुळे त्याला नजीकच्या ससूनवघर गावातील रुग्णालयात दाखवण्यात आलं. मात्र, तेथे डॉक्टरांनी चिमुकल्याला तपासून मृत घोषित केलं. मिळालेल्या माहितीनुसार, पेल्हार परिसरात राहणारा रियान शेख हा काल गुरुवारी दुपारी एका अपघातात चौथ्या मजल्यावरुन खाली पडला. या अपघातात त्याच्या पोटाला गंभीर दुखापत झाली. तातडीने त्याला जवळच्या गॅलेक्सी रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी प्राथमिक उपचार करुन त्याला मोठ्या रुग्णालयात हलवण्याचा सल्ला दिला.
रियानला वाचवण्यासाठी दुपारी सुमारे २.३० वाजताच्या सुमारास रुग्णवाहिकेद्वारे मुंबईकडे रवाना करण्यात आलं. मात्र, त्या दिवशी मुंबई–अहमदाबाद महामार्गावर सकाळपासूनच वाहतुकीची प्रचंड कोंडी निर्माण झाली होती. या कोंडीत रुग्णवाहिका तब्बल पाच तास अडकून राहिली, आणि रुग्णालयात पोहोचण्याआधीच रियानची प्रकृती जास्त खराब झाली. कोंडीत अडकलेली रुग्णवाहिका पुढे जाऊ शकत नसल्याने, अखेर रियानच्या कुटुंबीयांनी त्याला जवळच्याच ससूनवघर गावातील एका लहान रुग्णालयात नेलं. मात्र, तेथील डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केलं. या प्रकाराबाबत स्थानिक आमदार स्नेहा दुबे यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या की, ‘ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे. गेल्या महिन्याभरापासून येथील रस्ते खराब आहेत. म्हणून ट्रॅफिक होत होती. परंतु, परवा रात्रीपासून ठाण्याच्या पोलिस आयुक्तांनी एक अधिसूचना जारी केली. सकाळी सहा ते रात्री बारा वाजेपर्यंत अवजड वाहनांना ठाणे शहरात बंदी घातली. त्यामुळे जी तीन-चार तासाची ट्रॅफिक रस्त्यावर होत होती, ती आता आणखी वाढली आहे. वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी संपूर्ण पोलिस यंत्रणा कामाला लागलेली आहे. आम्ही देखील प्रयत्न करत आहोत. मात्र, अधिसूचना मागे घ्यावी आणि यातून मार्ग काढावा’, असं त्यांनी म्हटलं.