पोलीस ठाण्यातील राडा प्रकरणात भाजपचे माजी आमदार गणपत गायकवाड निर्दोष मुक्त
पोलीस महानगर नेटवर्क
कल्याण : भाजपचे माजी आमदार गणपत गायकवाड यांना मोठा दिलासा देणारा न्यायालयीन निर्णय समोर आला आहे. कोळसेवाडी पोलीस ठाण्यातील २०१४ साली झालेल्या राडा प्रकरणात कल्याण न्यायालयाने त्यांना निर्दोष मुक्त केले आहे. या खटल्यात गणपत गायकवाड यांच्यासह निलेश शिंदे आणि इतर तीन जणांचीही निर्दोष मुक्तता झाली. पुराव्यांच्या अभावामुळे न्यायालयाने सर्व आरोपींना मुक्त केले, अशी माहिती समोर आली आहे.
मात्र, या निर्णयामुळे गणपत गायकवाड यांना कारागृहातून तात्काळ सुटका होणार नाही. कारण, ते अद्यापही गेल्यावर्षी झालेल्या पोलीस ठाण्यातील गोळीबार प्रकरणात अटकेत असून न्यायालयीन कोठडीत आहेत. या प्रकरणामुळे त्यांना विधानसभा निवडणूक लढवता आली नव्हती, तसेच त्यांना आजतागायत जामीनही मिळालेला नाही.
पार्श्वभूमी : गोळीबार प्रकरणामुळे राज्य हादरले होते
गणपत गायकवाड आणि शिवसेनेचे तत्कालीन शहराध्यक्ष महेश गायकवाड यांच्यात जमिनीच्या वादातून तणाव निर्माण झाला होता. हा वाद पोलीस ठाण्यात पोहोचल्यावर परिस्थिती गंभीर बनली.
तेव्हा गणपत गायकवाड यांनी पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांच्या केबिनमध्येच बंदूक काढून महेश गायकवाड व त्यांचे सहकारी राहुल पाटील यांच्यावर गोळीबार केला होता. या घटनेत दोघेही गंभीर जखमी झाले होते, मात्र उपचारानंतर त्यांची प्रकृती स्थिर झाली.
या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. शिवाय, एका वृत्तवाहिनीला दिलेल्या प्रतिक्रियेत गणपत गायकवाड यांनी स्वतःकडून गोळीबार झाल्याचे मान्यही केले होते. त्यामुळे राज्यातील राजकीय वर्तुळात आणि पोलीस दलात खळबळ उडाली होती. २०१४ च्या राडा प्रकरणात मिळालेली निर्दोष मुक्तता ही गणपत गायकवाड यांच्यासाठी नक्कीच दिलासादायक ठरली आहे. मात्र, गोळीबार प्रकरणात न्यायालयीन सुनावणी सुरू असल्याने त्यांचा मुक्काम सध्या तरी कारागृहातच राहणार आहे. हा निर्णय गायकवाड समर्थकांसाठी दिलासा ठरला असला, तरी आगामी काळात त्यांचा राजकीय प्रवास आणि कायदेशीर लढाई कशी आकार घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.